Mani Ratnam : "हिंदी सिनेसृष्टीने 'बॉलिवूड' म्हणणं बंद करा तरच...", दिग्दर्शक मणिरत्नम यांचं परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:59 PM2023-04-20T12:59:03+5:302023-04-20T13:01:24+5:30
मणिरत्नम यांनी हिंदी सिनेसृष्टीला सुनावलं
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांनी बॉलिवूड आणि इतर मनोरंजनसृष्टी वादावर परखड मत व्यक्त केलं आहे. त्यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'पोन्नियन सेल्वन' प्रदर्शित झाला. आता याच्या दुसऱ्या भागाची चर्चा आहे. दरम्यान चेन्नईमध्ये आयोजित सिनेमा संबंधित एका चर्चासत्रात मणिरत्नम यांनी एकप्रकारे बॉलिवूडलाच सुनावलं.
चेन्नईमधील CII दक्षिण मीडिया आणि एंटरटेन्मेंट समिटमध्ये चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते म्हणाले, 'जर हिंदी चित्रपटसृष्टी स्वत:ला बॉलिवूड म्हणवून घेणं थांबवत असेल तर लोक भारतीय सिनेमाला बॉलिवूड म्हणणार नाहीत.' ते पुढे म्हणाले, 'मी काही बॉलिवूड, कॉलिवूड अशा वूड्सचा चाहता नाही. आपल्याला भारतीय सिनेमा म्हणूनच पाहण्याची गरज आहे.'
इतर देशात भारतीय सिनेमा बॉलिवूड म्हणूनच ओळखला जातो. नुकतंच RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. यावेळी होस्टने स्टेजवरुन बॉलिवूड सिनेमा असा उल्लेख केला होता. त्यामुळे आता खरोखरंच भारतीय सिनेमा अशी ओळख करण्याची वेळ आली आहे. चेन्नईत आयोजित या चर्चासत्रात मणिरत्नम यांनी याच मुद्द्यावर परखड मत व्यक्त केलं.