सुपरस्टार रजनीकांत ऐवजी हा बॉलिवूडचा अभिनेता दिसणार होता 2.0 मध्ये मुख्य भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 15:55 IST2018-11-28T15:48:25+5:302018-11-28T15:55:00+5:30
रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणावरून 2.0 हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांना या चित्रपटात काहीही करून रजनीकांतच मुख्य भूमिकेत हवे होते. पण रजनीकांत यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्याजवळ काहीही पर्याय नव्हता.

सुपरस्टार रजनीकांत ऐवजी हा बॉलिवूडचा अभिनेता दिसणार होता 2.0 मध्ये मुख्य भूमिकेत
रजनीकांत यांच्या 2.0 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून २०१० साली प्रदर्शित झालेल्या रोबोट या चित्रपटाचा हा सिक्वल असणार आहे. हा बिग बजेट चित्रपट असून रजनीकांत त्यांच्या चिट्टी रोबोट या भूमिकेत आठ वर्षांनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात रजनीकांत यांनी काम करण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे एका बॉलिवूड अभिनेत्याची ही भूमिका साकारण्यासाठी वर्णी लागली होती.
रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणावरून 2.0 हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांना या चित्रपटात काहीही करून रजनीकांतच मुख्य भूमिकेत हवे होते. पण रजनीकांत यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्याजवळ काहीही पर्याय नव्हता. त्यांनी एखाद्या सुपरस्टारला या भूमिकेत घ्यावे असे रजनीकांत यांनी एस. शंकर यांना सुचवले होते आणि त्यामुळेच या भूमिकेसाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला विचारण्यात आलेले होते. शाहरुख 2.0 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा देखील मीडियात सुरू झाली होती. पण २०१४ मध्ये रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांनी लिंगा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. लिंगा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एस. शंकर यांनी रजनीकांत यांना भेटून या चित्रपटात काम करण्यासाठी पुन्हा एकदा विचारले आणि त्यावेळी रजनीकांत यांनी या गोष्टीसाठी होकार दिला आणि अशाप्रकारे 2.0 या चित्रपटात रजनीकांत यांनीच काम करावे ही दिग्दर्शकाची इच्छा पूर्ण झाली.
2.0 या चित्रपटात अक्षय कुमार देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबतच अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे, आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिट ठरेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.