डिस्को डान्सर चित्रपटाशी संबंधीत या व्यक्तीची ढासळली तब्येत, करण्यात आले आयसीयूत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 01:10 PM2020-05-06T13:10:52+5:302020-05-06T13:15:11+5:30
या व्यक्तीला लीलवती रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.
मिथुन चक्रवर्तीला डिस्को डान्सर या चित्रपटाने खऱ्या अर्थाने स्टार बनवले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या नृत्याची चर्चा झाली होती. या चित्रपटानंतर मिथुनला एक चांगला डान्सर अशी ओळख बॉलिवूडमध्ये मिळाली. या चित्रपटाचे टायटल साँग आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या त्याच्या यशात त्याच्यासोबतच या चित्रपटाच्या प्रत्येक व्यक्तीचा हात होता. या चित्रपटाचा सिनेमोटोग्राफर हा नदीम खान होता. पण नदीमची तब्येत गेल्या काही दिवसांपासून अतिशय गंभीर असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नदीम खानने केवळ डिस्को डान्सरच नव्हे तर किंग अंकल, एक बार फिर, कब्जा, गमन, अलग अलग अशा अनेक चित्रपटांची देखील सिनेमॅटोग्राफी केली आहे. नदीमला लीलावतीमधील आयसीयू कक्षात दाखल केले असून त्याची पत्नी पार्वती सतत त्याच्यासोबत आहे. सोमवारी लीलावती रुग्णालयाच्या पायऱ्यांवरून घसरल्यामुळे नदीमला प्रचंड दुखापत झाली. त्याच्या डोक्याला, छातीला लागले असून त्याच्यावर सध्या तिथे उपचार सुरू आहेत.
नदीमने त्याच्या करियरची सुरुवात विधू विनोद चोप्रासोबत केली होती. मर्डर एट मंकी हिल या पहिल्याच चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. डिस्को डान्सर या चित्रपटासाठी तर नदीमचे चांगलेच कौतुक झाले होते. कारण या चित्रपटाच्या टायटल साँगच्या चित्रीकरणासाठी खूप सारी लायटिंगची गरज होती. पण निर्माते सुभाष बब्बर यांच्याकडे लायटिंगसाठी तितकासा पैसा नव्हता. त्यामुळे नदीमने घरगुती बल्ब, रंगीबेरंगी कागद लावून चित्रीकरण पूर्ण केले होते. हे गाणे त्याकाळात चांगलेच गाजले होते.