Death Anniversary : दिव्या भारतीने मृत्यूच्या दिवशी साईन केली होती ही डील...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 11:04 AM2020-04-05T11:04:46+5:302020-04-05T11:07:01+5:30
अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. ५ एप्रिल १९९३ रोजी दिव्याने अचानक जगाचा निरोप घेतला.
दीवाना, बलवान, दिल आशना है, दिल ही तो है आणि रंग सारखे सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. ५ एप्रिल 1993 रोजी दिव्याने अचानक जगाचा निरोप घेतला. त्यावेळी ती केवळ 19 वर्षांची होती. 1992 साली ‘विश्वात्मा’ या सिनेमातून तिने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील ‘सात समंदर पार मैं...’ या गाण्याने दिव्याला एका रात्रीत स्टार केले. हे गाणे हिट होताच दिव्याला 10 सिनेमे मिळाले. आपल्या छोट्याशा करिअरमध्ये दिव्याने 12 सिनेमे केलेत आणि एकदिवस अचानक सगळ्यांना धक्का देत या जगातून कायमची निघून गेली.
मृत्यूच्या वर्षभराआधी दिव्याने साजिद नाडियाडवालासोबत गुपचूप लग्न केले होते, असे मानले जाते. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतरच दिव्याच्या रहस्यमय मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू का झाला, कसा झाला, हे रहस्य आज २५ वर्षांनंतरही कायम आहे. दिव्याच्या मृत्युकडे संशयाने पाहणारे लोक तिचा कथित पती साजिद नाडियाडवाला याला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवतात. पण हे कधीच सिद्ध होऊ शकले नाही.
५ एप्रिल १९९३ रोजी आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला. ज्या दिवशी दिव्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी ती चेन्नईहून शूटींग करून परतली होती. यानंतर ती हैदराबादेत शूटींगसाठी जाणार होती. आपल्या नव्या फ्लॅटचे डीलही तिले साईन केले होते. पण दिव्याच्या पायाला दुखापत झाल्याने ऐनवेळी तिने हैदराबादेतील शूटींगचा प्लान रद्द केला होता़ पण त्याचदिवशी आपल्या फ्लॅटच्या इंटरेरियर डिझाईनसाठी ती नीता लुल्ला व तिचा पती श्याम लुल्ला यांना भेटली होती.
रात्री १० वाजता हे तिघेही भेटले. तिघांनीही एकत्र ड्रिंक घेतली़ असे म्हणतात की, दिव्याची मेड अमृता किचनमध्ये होती. नीता व श्याम लिव्हींग रूममध्ये व्हिडिओ पाहण्यात मग्न होते. दिव्या काही वेळानंतर खिडकीकडे गेली. बराच वेळ ती खिडकीत बसून होती. पण तिथून उठून वळताना अचानक तिचे संतुलन बिघडले आणि ती पाचव्या मजल्यावरून खाली पडली.
दिव्याच्या या खिडकीला ग्रिल नव्हती. त्या दिवशी पार्किंग एरियात एकही गाडीही उभी नव्हती. दिव्या थेट पार्किंग एरियाच्या जमिनीवर पडली. तिचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पण श्वास अजूनही सुरु होता. यानंतर दिव्याला तातडीने मुंबईच्या कूपर हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान दिव्याने अंतिम श्वास घेतला.