लग्नापूर्वी डॉ. नेने यांना माहित नव्हतं माधुरी दीक्षितचं 'हे' सत्य; लग्नाच्या दिवशीच बसला त्यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 01:18 PM2023-09-17T13:18:21+5:302023-09-17T13:19:07+5:30
Madhuri dixit: माधुरीने आपल्यासोबत लग्न करावं अशी अनेकांची इच्छा होती. परंतु, तिने सहजीवनाचा साथीदार म्हणून डॉ. नेने यांची निवड केली.
'दिल तो पागल है', 'हम आपके हैं कौन', 'खलनायक' अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमधून चाहत्यांना वेडं करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (madhuri dixit). उत्तम अभिनय शैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर माधुरी बघता बघता बॉलिवूडची धकधक गर्ल झाली. ९० चा काळ गाजवणाऱ्या माधुरीचे त्या काळात असंख्य चाहते होते. केवळ चाहतेच नव्हे तर अनेक कलाकारही असे होते ज्यांना माधुरीशी लग्न करायचं होतं. परंतु, विदेशात स्थायिक असलेल्या डॉ.श्रीराम नेने यांच्याशी लग्न करुन माधुरीने अनेकांना धक्का दिला. परंतु, माधुरीसोबत लग्न करणाऱ्या डॉ. नेने यांना माधुरीविषयी एक मोठी गोष्ट माहितच नव्हती. ही गोष्ट कळल्यानंतर ते थक्क झाले होते.
माधुरीने ९० चा काळ चांगलाच गाजवला. त्यामुळे त्या काळी तिची चाहत्यांमध्ये विशेष क्रेझ होती. माधुरीने आपल्यासोबत लग्न करावं अशी अनेकांची इच्छा होती. परंतु, तिने सहजीवनाचा साथीदार म्हणून डॉ. नेने यांची निवड केली. माधुरी यशाच्या शिखरावर असतानाच तिने लग्नाचा निर्णय घेतला. त्याकाळी देशभरात माधुरी प्रचंड लोकप्रिय होती.त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक माहिती चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे. परंतु, या सगळ्यात तिच्याविषयीची एक मोठी माहिती नेने यांना नव्हती.
लग्नाच्या दिवशी कळलं डॉ. नेने यांना माधुरीचं सत्य
डॉ. श्रीराम नेने हे अमेरिकेतील कार्डिओवॅस्कुलर सर्जन आहेत. अमेरिकेमध्ये माधुरी आणि त्यांची पहिली भेट झाली. माधुरीचा भाऊ अजित दीक्षित यांच्या एका पार्टीमध्ये माधुरी आणि डॉ. नेने यांची भेट झाली होती. या भेटीचं मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं. परंतु, माधुरीच्या प्रेमात पडल्यानंतरही ती मोठी अभिनेत्री असल्याचं त्यांना माहित नव्हतं. याविषयी एका मुलाखतीमध्ये माधुरीने याविषयीचा खुलासा केला.
'मी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे डॉ. नेने यांना माहितच नव्हतं. मी एका सामान्य मुलीप्रमाणे त्यांना भेटायला गेले होते. माझा हाच साधेपणा त्यांना आवडला आणि त्यांनी मला लग्नाची मागणी घातली', असं माधुरी म्हणाली.
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये माधुरी आणि नेने यांचा १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आयोजित केलेल्या रिसेप्शन पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये डॉ. नेने फक्त अमिताभ बच्चन यांनाच ओळखत होते. त्यामुळे बिग बींना पाहिल्यानंतर आपली पत्नी नेमकी कोण आहे यांचा अंदाज डॉ. नेने यांना आला. त्यामुळे लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये डॉ. नेने यांच्यासमोर माधुरी प्रसिद्ध अभिनेत्री असल्याचं सत्य समोर आलं.