पुण्यतिथी विशेष : सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आयुष्याचा प्रवास...!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 06:47 AM2017-07-18T06:47:41+5:302017-07-18T12:17:41+5:30
बाबू मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं जहाँपनाह, पुष्पा, आय हेट टिअर्स...असे म्हणत प्रेक्षकांना सतत आनंद ...
राजेश खन्ना यांचे खरे नाव जतीन खन्ना होते. पण काकाच्या म्हणण्यावरून जतीनचे राजेश खन्ना झाले. राजेश खन्ना यांना त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने दत्तक घेतले होते. चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना यांना काका म्हणून ओळखले जायचे. राजेश खन्ना सुपरस्टार असताना ‘ऊपर आका, निचे काका’ अशी एक म्हण प्रसिद्ध झाली होती. स्वत: त्यांनीच एका समारंभात सांगितल्यानुसार, काकेचा पंजाबीत एक छोटा मुलगा असा अर्थ होतो. जेव्हा मी चित्रपटांत आलो, त्या वेळी मी तरुण आणि छोटा होतो. त्यामुळे मला काका असे संबोधण्यात येऊ लागले. त्यानंतर माझ्याविषयी आदर म्हणून त्यापुढे ते चिकटले ते चिकटलेच.
अभिनेते जितेंद्र व राजेश खन्ना एकाच शाळेत शिकले. शाळा-कॉलेजमध्ये अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. लहानपणापासूनच राजेश खन्ना यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे स्ट्रगलच्या काळातही स्वत:ची स्पोर्टस कार घेऊन फिरणाºया काही अपवादात्मक नवकलाकारांपैकी राजेश खन्ना एक होते.
१९६५ मध्ये इंडिया टॅलेंट कॉन्टेस्ट जिंकले आणि पुढच्याच वर्षी ‘आखरी खत’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पण १९६९ मध्ये आलेल्या ‘आराधना’ या चित्रपटाने राजेश खन्ना यांना खºया अर्थाने सुपरस्टार बनवले. त्यानंतर ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’, ‘अपना देश’, ‘आप की कसम’, ‘मेरे जीवन साथी’, ‘आन मिलो सजना’, ‘नमक हराम’, ‘आनंद’, ‘हाथी मेरे साथी’ अशा १६३ चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांची व मुमताज, शर्मिला टागोर यांची जोडी खूप गाजली. अंजू महेंद्रूबरोबर त्यांनी काम केले आणि पुढे या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली. त्या दोघांची लव्हस्टोरी त्या वेळी प्रचंड गाजली.
तरूणींमध्ये राजेश खन्ना यांची प्रचंड क्रेज होती. अनेक तरूणी त्यांना रक्ताने पत्र लिहिायची. अनेकींनी त्याकाळात आपल्या हातावर राजेश खन्ना यांचे नाव आपल्या हातावर गोंदवले होते. अनेकींनी तर राजेश खन्ना यांच्या फोटोशी लग्नही केले होते. त्यांची पांढºया रंगाची गाडी कोणत्याही स्टुडिओच्या बाहेर उभी असली, की मुली त्या गाडीचेही चुंबन घ्यायच्या. त्या वेळेस त्यांची गाडी लिपस्टिकच्या खुणांनी भरलेली असायची.
अंजू महेंद्रूसोबत राजेश खन्ना यांचे रिलेशनशिप फार काळ टिकले नाही. याच काळात डिम्पल कपाडिया राजेश खन्ना यांच्या आयुष्यात आली. एका प्रोग्रामसाठी राजेश खन्ना विमानाने अहमदाबादला जात होते. याच विमानात राजेश खन्ना यांच्या बाजूच्या आसनावर डिम्पल बसली होती. डिम्पलचा ‘बॉबी’ हा पहिला सिनेमा रिलीज होणार होता. या पहिल्या भेटीतच राजेश खन्ना यांनी डिम्पलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही वयात बरेच अंतर होते. तरिही १९७३ मध्ये त्यांनी डिम्पल कपाडियाबरोबर लग्न केले. अर्थात हे लग्न शेवटपर्यंत टिकले नाहीच. ऐंशीच्या दशकात टीना मुनीममुळे डिम्पल आणि राजेश खन्ना यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि १९८४ मध्ये दोघेही वेगळे झालेत.
राजेश खन्ना सुपरस्टार असताना अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत होते. ‘आनंद’ या चित्रपटात राजेश खन्ना व अमिताभ एकत्र दिसले. यात अमिताभ सहअभिनेता होते. तर राजेश खन्ना लीड अॅक्टर. यानंतर १९७३ मध्ये ही जोडी ‘नमक हलाल’मध्ये एकत्र दिली. यात दोघांचीही भूमिका तोडीची होती. अमिताभ हळूहळू यशाच्या पायºया चढत होते तर राजेश खन्ना यांच्यावर स्टारडम हावी होत होते. राजेश खन्ना यांच्या जवळचे पत्रकार अली पीटर यांनी एका मुलाखतीत याबद्दल लिहिले होते. राजेश खन्ना यांच्या मनात अमिताभ यांना घेऊन असुरक्षितता घर करू लागली होती.
चित्रपटांपासून नाराज होत राजेश खन्ना राजकारणात आले. ९० व्या दशकात काँग्रेसच्या तिकिटावर लालकृष्ण अडवाणींविरोधात नवीदिल्लीची सीट त्यांनी निवडून लढली. पण त्यांचा पराभव झाला. पुढे अडवाणींनी गांधीनगर सीटसाठी नवी दिल्लीची सीट सोडली. यानंतर या सीटवर राजेश खन्ना यांनी शत्रूघ्न सिन्हा यांना हरवले व खासदार बनले. अर्थात पुढच्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. यानंतर राजेश खन्ना पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळले. पण त्यांना पुन्हा ते यश मिळवता आले नाही.