क्रू मेंबरसाठी अभिनेत्रीने केले सिंहासोबत दोन हात; स्वत:च्या लेकाला गमावलं पण इंडस्ट्रची झाली आई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:42 PM2024-01-19T16:42:22+5:302024-01-19T16:44:02+5:30
Durga khote: दुर्गा खोटे प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांच्या एका मुलाचं निधन झालं. मुलाच्या निधनामुळे त्यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता.
कलाविश्वात एक काळ असा होता जेव्हा स्त्रियांना त्यात कुठेच स्थान नव्हतं. किंबहुना, स्त्रियांनी सिनेमात वा नाटकात काम करणं म्हणजे असभ्यपणाचं लक्षण मानलं जायचं. मात्र, 'मुगल-ए-आझम' या सिनेमात जोधा बाई ही भूमिका साकारुन अभिनेत्री दुर्गा खोटे यांनी समाजाचा चुकीचा समज मोडून काढला. त्यांच्यामुळेच अन्य स्त्रियांना कलाविश्वाची दारं उघडी झाली. मराठमोळ्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या दुर्गा खोटे या बॉलिवूडच्या पहिली अभिनेत्री म्हणूनही ओळखल्या जातात. परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक खाचखळगे पार करत त्या या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याविषयी आज सुद्धा नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते.
दिवंगत अभिनेत्री दुर्गा खोटे यांनी मिर्जा गालिब, मुगगल-ए-आजम, दादी मां, आनंद, मुसाफिर, बावर्ची, बॉबी, भरत मिलाप, नमक हराम आणि कर्ज यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, त्यांच्या आयुष्यात असा एक काळ आला ज्यामुळे त्या कोलमडून गेल्या आणि त्यांनी इंडस्ट्रीपासून फारकत घेतली.
दुर्गा खोटे यांचं कमी वयात लग्न झालं होतं. त्यामुळे वयाच्या २६ व्या वर्षीच त्या २ मुलांची आई होत्या. परंतु, पतीच्या निधनानंतर त्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं. परिणामी, मुलांचा सांभाळ करता यावा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करता यावं यासाठी त्यांनी अभिनयाची वाट धरली.
पतीच्या निधनानंतर दुर्गा खोटे मुलांच्या ट्युशन घेऊन घर चालवत होत्या. याच काळात जे. बी.एच. वाडिया हे त्यांच्या सिनेमासाठी नवा चेहरा शोधत होते. त्यांनी दुर्गा यांच्या बहिणीला शालिनीला या सिनेमाची ऑफर दिली होती. मात्र, तिने स्वत: ऐवजी दुर्गा यांचं नाव सुचवलं. विशेष म्हणजे दुर्गा यांनीही या सिनेमासाठी होकार दिला आणि त्या 'फरेबी जाल' या १९३१ सालच्या सिनेमात पहिल्यांदा झळकल्या. या सिनेमानंतर त्यांनी व्ही. शांताराम यांच्या सिनेमातून पुन्हा इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 'अयोध्येचा राजा' या सिनेमात त्या झळकल्या. या सिनेमानंतर त्यांच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या.
क्रू मेंबरसाठी केले सिंहासोबत दोन हात
दुर्गा खोटे कोल्हापूरमध्ये एका सिनेमाचं शूट करत होत्या. त्यावेळी सेटवर काही सिंह आणलं होते. या सिंहांसोबत त्यांचे ट्रेनर सुद्धा होते. मात्र, अचानकपणे एक सिंह सुटला आणि त्याने एका क्रू मेंबरवर हल्ला केला. त्या मेंबरला वाचवण्यासाठी दुर्गा खोटे स्वत: सिंहासमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यानंतर काही वेळाने त्यांचा ट्रेनर आला आणि त्याने सिंहावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे दुर्गा खोटे थोडक्यात बचावल्या.
इंडस्ट्रीच्या झाल्या आई
दुर्गा खोटे प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांच्या एका मुलाचं निधन झालं. मुलाच्या निधनामुळे त्यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. मात्र, तरी सुद्धा त्या स्क्रीनवर आईची भूमिका साकारत होत्या. त्यांनी मुगल-ए-आझम सिनेमात सलीमची आई जोधा बाई ही भूमिका साकारली होती जी प्रचंड गाजली. त्यानंतर त्यांनी जीत, सिंगार, हम लोग, मिर्जा गालिब, दो भाई, पहेली, पापी आणि दौलत का दुश्मन या सिनेमांमध्येही आईची भूमिका साकारली होती.