'मैंने प्यार किया'च्या पोस्टर शूटवेळी ५ महिन्यांची प्रेग्नेंट होती भाग्यश्री, सलमान खानने केली होती ही कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:13 PM2023-12-23T12:13:59+5:302023-12-23T12:14:21+5:30
Bhaghyashree And Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने सूरज बडजात्याच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यात तिचा नायक होता सलमान खान. भाग्यश्रीसाठी हे स्वप्नवत पदार्पण होते कारण या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले.
बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री(Bhagyashree)ने सूरज बडजात्याच्या 'मैने प्यार किया' (Maine Pyar Kiya) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यात तिचा नायक होता सलमान खान (Salman Khan). भाग्यश्रीसाठी हे स्वप्नवत पदार्पण होते कारण या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. आजही चाहते भाग्यश्रीची आठवण 'मैने प्यार किया'साठी करतात. सुपरहिट पदार्पणानंतर भाग्यश्रीकडे चित्रपटांची रांग लागली होती. पण आणखी चित्रपट साइन करण्याऐवजी अभिनेत्रीने लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला. डेब्यूच्या वेळी भाग्यश्री हिमालय दासानीला डेट करत होती आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोघांनी लग्न केले.
'रेजिंग स्टार्स' पुस्तकाच्या रश्मी उचील यांच्याशी बोलताना भाग्यश्रीने सलमान खानसोबत 'मैने प्यार किया'च्या पोस्टरसाठी शूटिंग करतानाचा प्रसंग आठवला. भाग्यश्रीने सांगितले की, त्यावेळी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच माहिती नव्हती. सलमानलाही याची जाणीव नव्हती आणि त्याने लग्नानंतर लठ्ठ झाल्याची टिप्पणी अभिनेत्रीवर केली होती. पुस्तकाचा हवाला देत भाग्यश्रीने सांगितले की, 'जेव्हा प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजदक्ष्यने 'मैने प्यार किया'साठी माझे आणि सलमानसोबत फोटोशूट केले तेव्हा मी ५ महिन्यांची गरोदर होती. कोणालाही माहीत नव्हते. मला आठवतंय की सलमान मला म्हणाला होता, 'लग्नानंतर तू लठ्ठ झाली आहेस.'
मुलीच्या जन्मानंतर साऊथ चित्रपटात केले काम
भाग्यश्रीने सांगितले की, लग्नानंतर आणि मुले झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्राला राम राम केला आणि आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगी अवंतिकाला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीने काही तेलुगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. भाग्यश्रीने सांगितले की, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची शैली खूपच स्मूथ आहे. तिथे लोक शूटिंग शेड्यूल फॉलो करतात. शूटिंग सकाळी ९ वाजता सुरू होते आणि दुपारी १ वाजता जेवण होते. भाग्यश्रीच्या मते, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणे तिच्यासाठी आशीर्वादापेक्षा कमी नव्हते.
पुन्हा एकदा या सिनेमात भाग्यश्रीने केले सलमानसोबत काम
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर भाग्यश्री काही काळापूर्वी 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये पतीसोबत दिसली होती. याआधी ती 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खानसोबत छोट्या भूमिकेत दिसली होती.