'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 21:00 IST2019-04-27T21:00:00+5:302019-04-27T21:00:00+5:30
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमाने आधुनिक काळातील रोमान्सवर ताज्या दमाचे आणि काहीसे साहसी भाष्य केले.

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमाने आधुनिक काळातील रोमान्सवर ताज्या दमाचे आणि काहीसे साहसी भाष्य केले. बॉलिवुडमधील ठरलेल्या साच्यातील प्रेमकथांना वगळून या सिनेमाने मुख्य प्रवाहातील सिनेमात समलिंगी प्रेमकथेतील प्रणय कलात्मकरित्या रंगवून या प्रश्नाला असलेल्या सामाजिक बाजूंचाही वेध घेतला. जाणकारांनी नावाजलेल्या या सिनेमाचा प्रीमियर २८ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता सोनी मॅक्सवर होणार आहे.
बॉलिवुडमधील पहिलीवहिली तृतीयपंथी लेखिका गझल धालीवाल यांनी लिहिलेल्या 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमात फारच सकारात्मक पद्धतीने आणि अतिशय संवेदनशील आणि काळजीने या नाजूक विषयाला हाताळण्यात आले आहे. अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला अशा उत्कृष्ट कलाकारांची या सिनेमात मांदियाळी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनिल कपूर-सोनम कपूर ही बापलेकीची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली.
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' ही स्वीटी (सोनम कपूर) या तरुणीची कथा आहे. कुहू (रेगिना कँसँड्रा) या महिलेसोबत असलेले आपले प्रेमाचे संबंध आपल्या जुन्या विचारांच्या कुटुंबाने मान्य करावेत, यासाठी ती प्रयत्नशील आहे. आपली ही लैंगिक वृत्ती तिने कायमच घरच्यांपासून लपवून ठेवली, मात्र, कुहूच्या रुपात 'सोलमेट' भेटल्यानंतर आपल्याला हवे तसे आयुष्य जगण्यासाठी पळून जाण्याचा निर्णय ती घेते.
मात्र, तिच्यावर सतत पाळत ठेवून असणाऱ्या भावामुळे (अभिषेक दुहान) तिचा हा प्लॅन रखडतो. पळून जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असताना तिला साहील (राजकुमार राव) भेटतो. स्वयंप्रेरणेतून लेखनाकडे वळलेला साहील पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडतो. स्वीटीला त्याच्यामध्ये एक खरा मित्र भेटतो आणि ती आपल्या भावना त्याच्याकडे व्यक्त करते. तिच्या लैंगिक निवडीबद्दल तिच्या वडिलांना (अनिल कपूर) समजावण्यासाठी तो तिची मदत करण्याचा निर्णय घेतो, यावर आधारीत या चित्रपटाचे कथानक आहे.
या चित्रपटाबाबत सोनम म्हणाली, ''मी वडिलांसोबत काम करणं नेहमीच टाळत आले होते आणि मला वाटतं 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मुळे मी यातून बाहेर पडले. हा सिनेमा केल्यामुळे वडिलांसोबत पडद्यावर दिसण्याबद्दल जी भीती होती त्यावर मी मात केली.''