वाढत्या वादाने एकता कपूर चिंतीत, बदलणार का ‘मेंटल है क्या’चे टायटल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 02:30 PM2019-05-02T14:30:12+5:302019-05-02T14:31:01+5:30
कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वी चित्रपटाच्या टायटलवरून निर्माण झालेला वाद जोरात आहे.
कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वी चित्रपटाच्या टायटलवरून निर्माण झालेला वाद जोरात आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर तीव्र आक्षेप नोंदवत, सेन्सॉर बोर्ड, माहिती व प्रसारण मंत्रालय, पीएमओ अशा सगळ्यांना पत्र लिहिले आहे. केवळ इतकेच नाही तर दीपिका पादुकोणच्या द लिव्ह लाफ फाऊंडेशनसनेही या चित्रपटाच्या मेकर्सवर टीका करत, आपल्या जबाबदारीचे भान ठेवा, असे म्हटले आहे. नाही म्हणायला या वादावर नेहमीप्रमाणे कंगनाच्या वतीने तिची बहीण रंगोली मैदान लढवते आहे. पण ‘मेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूर मात्र हा वाद आणखी वाढवण्याच्या मूडमध्ये नाही. कदाचित त्याचमुळे तिने एक मोठा निर्णय घेतलाय.
होय, डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘मेंटल है क्या’ हे टायटल बदलण्याचा एकताचा विचार आहे. दिवसागणिक हा वाद थांबेल, असा एकताचा कयास होता. पण हा वाद शमण्याऐवजी आणखी भडकण्याचीच चिन्हे आहेत. या सिनेमाचे नाव मनोरूग्णांना चुकीच्या पद्धतीने समाजापुढे मांडत असल्याची इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीची तक्रार आहे. त्यामुळे हा वाद निकाली काढायचा झाल्यास चित्रपटाचे शीर्षक बदलण्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय मेकर्सकडे नाही. अशास्थितीत योग्यवेळी टायटल बदलणे एकताला गरजेचे वाटू लागले आहे. अद्याप टायटल बदलण्याचा निर्णय झालेला नाही. पण लवकरच हा निर्णय अमलात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘मेंटल है क्या’ हा चित्रपट एकता कपूर प्रोड्यूस करतेय. तर प्रकाश कोवेलामुडी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात कंगना व राजकुमार रावशिवाय अमायरा दस्तूर, अमृता पूरी, जिमी शेरगिल असे सगळे कलाकार आहेत. शाहरूख खानही यात कॅमिओ रोलमध्ये असल्याची चर्चा आहे. आधी या चित्रपटासाठी करिना कपूरचे नाव फायनल झाले होते. पण चित्रपटाच्या बोल्ड कंटेन्टमुळे करिनाने हा चित्रपट नाकारला आणि चित्रपटात कंगनाची वर्णी लागली.