ऐश्वर्याबद्दल केलेल्या 'त्या' विधानाची इमरान हाशमीला वाटतेय लाज, म्हणाला- "मला तिची माफी मागायची आहे"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:18 PM2024-07-12T13:18:47+5:302024-07-12T13:19:25+5:30
इमरान हाशमीला मागायची आहे ऐश्वर्या रायची माफी, KWK मध्ये अभिनेत्रीवर केलेली कमेंट
इमरान हाशमी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून इमरानने बॉलिवूडमध्ये त्याचं बस्तान बसवलं. 'मर्डर' या सिनेमात इंटिमेट सीन देऊन इमरान हाशमी प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर 'जन्नत', 'आशिक बनाया आपने', 'राज ३', 'जहर', 'गँगस्टर : अ लव्ह स्टोरी' अशा सिनेमांमध्ये तो दिसला. बॉलिवूडमधील करिअरमध्ये इमरान हाशमीबाबत फार कमी कॉन्ट्रोव्हर्सी ऐकायला मिळाल्या. त्यातलीच एक म्हणजे मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल अभिनेत्याने केलेली कमेंट...
करण जोहरच्या कॉफी विथ करण ४ मध्ये इमरान हाशमीने हजेरी लावली होती. या शोमधील रॅपिड फायर राऊंडमध्ये इमरानने ऐश्वर्याची तुलना प्लास्टिकबरोबर केली होती. ऐश्वर्याबद्दल केलेल्या या विधानाचा आता अभिनेत्याला पश्चाताप होत असल्याचं त्याने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. इमरानने ऐश्वर्याची माफी मागण्याची इच्छाही व्यक्त केली. तो म्हणाला, "आता मला मी केलेल्या विधानाची लाज वाटतेय. माझं विधान कदाचित अपमानकारक असेल. पण, माझ्या मनात ऐश्वर्याबाबत आदर आहे. तुम्ही शो पाहिला तर लक्षात येईल की ते चुकीचं होतं. लोक खूप भावनिक आहे. सोशल मीडियावर लोक त्यांची नाराजी व्यक्त करतात".
"त्या शोमध्ये तो खरं तर एक जोक होता. पण, आताच्या काळात लोकांना ते आक्षेपार्ह वाटू शकतं. आजच्या समाजात तुम्ही अशा प्रकारची उत्तरं देऊ शकत नाही", असं इमरान पुढे म्हणाला. कधी ऐश्वर्याला भेटला आहेस का? असा प्रश्न इमरानला विचारण्यात आला.
यावर उत्तर देत तो म्हणाला, "हम दिल चुके सनमच्या शूटिंगवेळी मी ऐश्वर्याच्या व्हॅनिटीबाहेर तीन तास तिची वाट बघत उभा होतो. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. फिल्मीस्तानमध्ये तेव्हा शूटिंग सुरू होतं. माझ्या कसूर सिनेमाचं शूटिंग संपलं होतं. तर ऐश्वर्या हम दिल दे चुके सनमसाठी शूट करत होती. मला तिला भेटायचं होतं. पण, ते शक्य झालं नाही. आम्ही कधीच भेटलेलो नाही. पण, जेव्हा कधी मी तिला भेटेन तेव्हा मी नक्की तिची माफी मागेन".