"अभिनेत्रीने इंटिमेट सीन करायला नकार दिला तर.."; इमरान हाश्मी स्पष्टच म्हणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:00 IST2025-04-15T10:59:07+5:302025-04-15T11:00:00+5:30
इमरान हाश्मीने इंटिमेट सीनचं शूटिंग करताना पडद्यामागे काय घडतं, याचा खुलासा केलाय (emraan hashmi)

"अभिनेत्रीने इंटिमेट सीन करायला नकार दिला तर.."; इमरान हाश्मी स्पष्टच म्हणाला
इमरान हाश्मी (emraan hashmi) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. इमरानने गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये विविध भूमिकांमधून काम केलं. इमरानने सुरुवातीला केलेल्या बोल्ड भूमिकांमुळे त्याला 'सीरियल किसर' हा टॅग लागला. पण 'शांघाय', 'टायगर ३' अशा सिनेमांच्या माध्यमातून इमरानने काहीशा वेगळ्या भूमिकाही साकारल्या. अशातच इमरानने एका पॉडकास्टमध्ये इंटिमेट सीन करताना एखादी अभिनेत्री जर कंफर्टेबल नसेल तर, त्यावेळी काय केलं आहे, याचा खुलासा केलाय.
इमरान हाश्मीने सांगितलं इंटिमेट सीनमागचं वास्तव
सिनेमा एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत इमरान म्हणाला की, "मी अनेकदा दिग्दर्शकाशी बोलून सह-कलाकारासोबत जे इंटिमेट सीन करणार असतो, त्याविषयी चर्चा करतो. इंटिमेट सीन करताना एक पारदर्शकता आणि सहजता असेल, याचा आम्ही विचार करतो. अनेकदा असं झालंय की, एखादी सह-कलाकार असा एखादा किसिंग सीन करण्यासाठी तयार नसेल. किंवा त्या कलाकाराला अवघडलेपणा येत असेल तर आम्ही तो सीन, तसा एखादा डान्स रद्दही केला आहे." अशाप्रकारे इमरानने इंटिमेट सीनबद्दल त्याचं मत मांडलंय.
इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याच्या आगामी 'ग्राऊंड झिरो' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'ग्राऊंड झिरो'मध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात इमरान बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.