‘चीट इंडिया’ नाही ‘व्हाय चीट इंडिया’! ऐनवेळी बदलले इमरान हाश्मीच्या चित्रपटाचे नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 03:44 PM2019-01-11T15:44:05+5:302019-01-11T15:45:14+5:30
सुरूवातीला ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले होते. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवत, ते बदलण्याचे आदेश दिले.
येत्या शुक्रवारी म्हणजे १८ जानेवारीला इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’, थांबा...थांबा...‘चीट इंडिया’ नाही तर ‘व्हाय चीट इंडिया’ हा चित्रपट रिलीज होतोय. होय, रिलीजच्या ऐन तोंडावर इमरानच्या या चित्रपटाचे नाव बदलून ‘व्हाय चीट इंडिया’ करण्यात आले आहे.
सुरूवातीला ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले होते. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवत, ते बदलण्याचे आदेश दिले. चित्रपटाचे ‘चीट इंडिया’ हे शीर्षक भ्रामक व वादग्रस्त असल्याचे सेन्सॉर बोर्डाचे मत पडले. अखेर सेन्सॉर बोर्डाचा आदेश मानत निर्मात्यांनी ‘चीट इंडिया’चे ‘व्हाय चीट इंडिया’ असे नवे नामकरण केले. आता ‘व्हाय चीट इंडिया’ या नावानेच हा चित्रपट प्रदर्शित होईल.
#CheatIndia is now titled #WhyCheatIndia... Releases next Fri [18 Jan 2019].
— taran adarsh (@taran_adarsh) January 10, 2019
निर्मात्यांनी खुद्द याबद्दलची माहिती दिली आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘चीट इंडिया’ नावावर आक्षेप घेतला होता. रिलीजला एक आठवडा शिल्लक असताना चित्रपटाचे नाव बदलणे आमच्यासाठी कठीण आहे, अशी बाजू आम्ही मांडली. पण अखेर नाव बदलण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने आम्ही ‘व्हाय चीट इंडिया’ असे नवे नामकरण केले, असे निर्मात्यांनी सांगितले.
याआधी ऐनवेळी ‘व्हाय चीट इंडिया’ची रिलीज डेट बदलली गेली होती. आधी हा चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होणार होता. पण ‘मणिकर्णिका’,‘ठाकरे’ या चित्रपटांशी बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टाळण्यासाठी ‘व्हाय चीट इंडिया’च्या मेकर्सनी अचानक आपल्या चित्रपटाच्या रिलीजसाठी एक आठवडापूर्वीची तारीख निवडली. आता ‘चीट इंडिया’ २५ जानेवारीऐवजी येत्या १८ जानेवारीला रिलीज होणार आहे. सौमिक सेन दिग्दर्शित ‘चीट इंडिया’ हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. गतवर्षी रिलीज झालेल्या इमरान खानच्या ‘हिंदी मीडियम’ने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता इमरान हाश्मीही असेच काही करताना दिसणार आहे. इमरानने या चित्रपटात डोनेशन घेऊन मुलांचे अॅडमिशन करून देणा-या राकेश सिंह नावाचे पात्र साकारले आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करतो आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीशिवाय श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.