ईशा गुप्ताने महाकुंभ येथे केलं शाही स्नान; योगी सरकारचं कौतुक करत म्हणाली, "सनातन धर्म..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:38 IST2025-02-07T13:37:45+5:302025-02-07T13:38:26+5:30
महाकुंभ येथे दर्शन आणि शाही स्नान केल्यानंतर ईशा गुप्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या.

ईशा गुप्ताने महाकुंभ येथे केलं शाही स्नान; योगी सरकारचं कौतुक करत म्हणाली, "सनातन धर्म..."
प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ येथे अनेक दिग्गजांनी हजेरी लावत पवित्र स्नान केलं. महाकुंभची जगभरात चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही महाकुंभ येथे शाही स्नान केलं. नुकतीच अभिनेत्री ईशा गुप्ताही (Esha Gupta) महाकुंभमध्ये सहभागी झाली होती. तिने यावेळी योगी सरकारची स्तुती केली. तसंच इथला अनुभवही सांगितला.
महाकुंभ येथे दर्शन आणि शाही स्नान केल्यानंतर ईशा गुप्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "कलाकारांनी इतरांवर टिप्पणी करावी हे आमचं काम नाही. आमचं काम अभिनय करणं आहे. पण इथे मी एक अभिनेत्री म्हणून आलेले नाही. मी आज इथे सनातन धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आले आहे. एक मुलगी, एक भारतीय म्हणून मी आले आहे. कुंभमध्ये येण्याची अशी संधी कदाचित मिळाली नसती. त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन इथे या धर्म किंवा कर्म साठी या पण नक्की या."
ती पुढे म्हणाली, "अख्ख्या जगात महाकुंभचं अशा प्रकारचं भव्य आयोजन होऊच शकलं नसतं. इथली व्यवस्था खूपच चांगली आहे. १४४ वर्षात अशी संधी मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी याला भव्य दिव्य बनवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. भारत देशात आहे तशी श्रद्धा, आस्था आणखी कुठेही नाही हे अख्ख्या जगाला माहित आहे. महाकुंभच्या माध्यमातून संपूर्ण जग याचा अनुभव घेत आहे.
ईशाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केला आहे. 'दिव्य कुंभ-भव्य कुंभ' असं कॅप्शनही दिलं आहे.