हा प्रत्येक मजूराचा अधिकार.... ! म्हणून सलमान, शाहरूख जे करू शकला नाही ते सोनू सूदने केले!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:20 AM2020-05-12T10:20:13+5:302020-05-12T10:22:20+5:30
सोनू सूदने असे काही केले की, शेकडो मजुरांनी त्याला तोंडभरून आशीर्वाद दिला...
लॉकडाऊनमुळे हजारोंच्या संख्येतील मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, अशा अवस्थेत या मजूरांनी शेकडो किमीची पायपीट करत आपल्या मूळ गावाचा रस्ता धरला आहे. सरकार या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे प्रयत्न करतेय. पण आताश: या गरिब, अगतिक मजुरांचा धीर सुटत चाललाय. कसेही करून लवकरात लवकर त्यांना आपल्या घरी परतायचे आहे. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या मजुरांच्या मदतीसाठी धावला आहे. होय, बस सेवा सुरू करून सोनू आपल्या घरापासून, आप्तांपासून दूर अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवत आहे.
Thank u so much mere bhai ❣️ https://t.co/0Kwt7y1UA2
— sonu sood (@SonuSood) May 11, 2020
या मजुरांच्या प्रवासाचीच नाही तर त्यांच्या जेवणाची सोयही सोनूने केली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सरकारची परवानगी घेत, सोनूने ही बस सेवा सुरु केली. याअंतर्गत महाराष्ट्राच्या ठाण्यावरून कर्नाटकाच्या गुलबर्गासाठी 10 गाड्या मजुरांना घेऊन रवाना झाल्यात. सोनूने स्वत: या मजुरांना निरोप दिला.
याआधी सोनूने आपले अलिशान हॉटेल आरोग्य कर्मचा-यांसाठी खुले केले होते.
सोनू म्हणतो, प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार
कोरोना महामारीच्या या संकटकाळात आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमार असे अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कुणी पैसे दान देतोय, कुणी गरजूंना अन्नधान्य देतोय, भोजनाची व्यवस्था करतोय. पण मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करणारा सोनू सूद पहिला सेलिब्रिटी आहे. त्याच्या मनात हा विचार कसा आला, सोनू यावर बोलला. कोरोनाचे संकट गंभीर आहे. आपण सर्व या जागतिक संकटाचा सामना करत आहोत. माझ्यामते, या संकटकाळात प्रत्येक भारतीयाला त्याच्या कुटुंबासोबत, आप्तांसोबत राहण्याचा अधिकार आहे. हाच विचार करून मी कर्नाटक व महाराष्ट्र सरकारकडून परवानगी घेत, मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा विचार केला. महाराष्ट्र सरकारने सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात माझी खूप मदत केली. कर्नाटक सरकारनेही आपल्या मजुरांचे स्वागत केले. पुढेही मला शक्य असेल तेवढी मदत मी करणार आहे.