प्रत्येक गाण्याचा रंग अन् ढंग वेगळा!- गायक जावेद अली
By अबोली कुलकर्णी | Published: October 16, 2018 05:04 PM2018-10-16T17:04:25+5:302018-10-16T17:30:44+5:30
जावेद अली २०, २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ‘हंगामा बॉलिवूड म्युजिक प्रोजेक्ट सीझन ४’ मध्ये प्रथमच परफॉर्म करणार आहे.
अबोली कुलकर्णी
संगीतावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सध्याच्या काळातील नव्या दमाचे गायक जावेद अली यांचे नाव ठाऊक नसेल तर नवलच! ‘तू ही हकीकत’,‘तुम मिले’,‘जश्न ए बहारा’,‘इशकजादे’ अशी दमदार गाणी गावून त्यांनी रसिकांवर अक्षरश: मोहिनी घातली. शास्त्रीय संगीतावर आधारित सुफी गाणी तसेच रोमँटिक गाणी त्यांनी गायली असून त्यांच्या गाण्याचे लाखो फॅन्स आहेत. जावेद अली २०, २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ‘हंगामा बॉलिवूड म्युजिक प्रोजेक्ट सीझन ४’ मध्ये प्रथमच परफॉर्म करणार आहे. त्यासंदर्भात त्याच्याशी केलेला हा संवाद...
* तू प्रथमच ‘हंगामा बॉलिवूड म्युजिक प्रोजेक्ट सीझन ४’ मध्ये परफॉर्म करणार आहेस. तू कोणत्या गाण्यांवर परफॉर्म करणार आहेस, याबद्दल जाणून घ्यायला आवडेल?
- मी माझ्या लाडक्या चाहत्यांसाठी वेगवेगळया प्रकारची गाणी गाणार आहे. त्यात रोमँटिक, वेस्टर्न रोमँटिक, सुफी अशी सर्वच गाणी गाणार आहे. चाहत्यांना ती आवडतील असा माझा विश्वास आहे.
* या सीझनसाठी तू किती उत्सुक आहेस?
- नक्कीच मी खूप उत्सुक आहे. कारण यानिमित्ताने अनेक चांगल्या गायकांना ऐकायलाही मिळतं. चाहत्यांची इच्छा गाण्यातून पूर्ण करण्याचा मला आनंदच आहे. खरंतर असे सोहळे आम्हा गायकांसाठीही सुखसोहळे घेऊन येत असतात. त्यामुळे मजा येईल, याची खात्री आहे.
* आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी काय सांगाल?
- खरंतर माझं करिअर २००७ पासून सुरू झालं. त्याअगोदर मी स्ट्रगल करायचो. पण, यादरम्यान बरंच काही शिकलो. ११ वर्षांच्या या प्रवासात फॅन्सनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. मला खुप शिकायला मिळालं. इथून पुढेही मी तोच माझ्यातला विद्यार्थी जपणार आहे.
* तुम्हाला जवळपास ७ वर्षे स्ट्रगल करावा लागला. त्या दिवसांत कोणती गोष्ट तुम्हाला प्रेरणा द्यायची?
- मला कायम प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे माझ्यातला आत्मविश्वास. मला विश्वास असायचा की, मी ध्येय नक्कीच गाठू शकेल. यामुळे मला नेहमी प्रोत्साहन मिळत असे.
* तुम्ही वेगवेगळया प्रकारचे गाणे गायले आहेत. तरी पण तुम्ही सुफी आधारित गाण्यांसाठीच ओळखले जाता. असे का?
- होय, हे खरं आहे. सुफी गाण्यांसाठी मी ओळखला जात असलो तरीही माझी रोमँटिक गाणी देखील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. ‘तू ही हकिकत’,‘तुम मिले’,‘जश्न ए बहारा’, इश्कजादे ही गाणी रोमँटिक गाणी चाहत्यांना बेहद आवडतात. इंडस्ट्रीत शास्त्रीय संगीत आधारित गाणारे गायक खूप कमी आहेत. यामुळे मला कायम लोकांचे पे्रम मिळाले आहे. मी त्यासाठी त्यांचा आभारी आहे.
* ए.आर.रहमान हे तुमच्यासाठी लकी ठरले आहेत. ‘जश्न ऐ बहारा’ आणि ‘तुम तक’ या गाण्यामुळे तुम्हाला फेम मिळाली. काय सांगाल?
- नक्कीच. ते माझ्यासाठी लकी आहेत. त्यांच्यासोबत गाणी गाणं हे माझं स्वप्न होतं. अनेकदा मी कॉन्सर्टमध्येही त्यांच्यासोबत गाणीही गातो. मी आत्तापर्यंत वेगवेगळे गाणे गायले आहेत. वेगवेगळया संगीतकारांसोबत गाणी गाण्याचा अनुभव मजेशीर आहे.
* तुम्ही इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केलं आहे. इतर गायकांपेक्षा तुम्ही वेगळे किती?
- प्रत्येक गायकाचा स्वत:चा एक रंग असतो. प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने गातो. मात्र, इंडस्ट्रीत सगळेच जण चांगले काम करतात. मी प्रामाणिकपणे माझ्या गायनावर विशेष लक्ष देत असतो, हेच माझे वेगळेपण म्हणता येईल.
* स्वत:ला स्पर्धेसाठी तयार कसे ठेवता?
- स्पर्धेबद्दल मी जास्त विचार करत नाही. प्रामाणिकपणे मी करत राहतो. स्वत:ला जास्तीत जास्त अपडेट करत राहतो. सध्याच्या इंडस्ट्रीतील इतर गायकांना देखील मी ऐकतो. बरंच काही मलाही शिकायला मिळतं.
* एखाद्या गायकासाठी किती महत्त्वाचं असतं अभिनेता किंवा अभिनेत्रीला जाणून घेणं?
- खूप महत्त्वाचं असतं. कारण जर तुम्हाला त्या कलाकारासाठी गाणं गायचं असेल तर त्याचा अॅटिट्यूड, स्टाईल सगळं लक्षात घ्यावं लागतं. तरच गाणं छान खुलतं.
* एक नवा ट्रेंड आला आहे. प्रत्येक चित्रपटात एक तरी आयटम साँग असतेच. हे मार्केटिंगचे फंडे असतात का?
- प्रत्येक गाण्याचा रंग आणि ढंग असतो. त्याप्रमाणे ते गाणे बनवले आणि गायले जातात. हे मार्केटिंगचे फंडे असत नाहीत पण, या गाण्यांची आपली एक वेगळीच मजा असते.