Exclusive : कल्की कोचलिनचे नवे नाटक लवकरच होणार दाखल
By तेजल गावडे | Published: October 27, 2018 04:16 PM2018-10-27T16:16:46+5:302018-10-27T16:18:34+5:30
अभिनेत्री कल्की कोचलिनचे नवीन नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे.
'ये जवानी है दिवानी' सिनेमातून अभिनेत्री कल्की कोचलिनने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. हा सिनेमा व त्यातील भूमिका रसिकांना खूपच भावली होती. कल्कीने चित्रपटाव्यतिरिक्त नाटकातही काम केले आहे. आता तिचे नवीन नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकाचे नाव 'द रेप ऑफ लुक्रिक' असे आहे. या नाटकाची रिहर्सल सध्या कल्की करते आहे.
याबाबत कल्की कोचलिनने सांगितले, 'मी एका नाटकात काम करते आहे. ज्याच्या सरावाला आता मी सुरूवात केली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस हे नाटक रंगमंचावर दाखल होईल. एनसीपीएमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडणार आहे. या नाटकाचे नाव आहे 'द रेप ऑफ लुक्रिक' (The Rape of Lucrece). शेक्सपीअरने एक कविता लिहिली होती. ही सत्य घटनेवर आधारीत आहे. रोमन काळात एका महिलेवर बलात्कार होतो आणि त्यावेळेस ती अन्यायाविरोधात लढते. चारशे वर्षांपूर्वी देखील मीटू प्रकरण होते. जे आम्ही या नाटकातून दाखवणार आहोत.'
कल्कीचा नुकतीच 'स्मोक' ही वेबसीरिज इरॉस नाऊवर दाखल झाली आहे. 'स्मोक' ही वेबसीरिज गोवा माफियावर भाष्य करते. यात कल्कीने डीजे प्लेयरची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजबद्दल तिने सांगितले की, मी अशापद्धतीचा गोवा याआधी कधी पाहिला नव्हता. आपण गोव्याकडे हॉलिडे स्पॉ़ट व मजामस्ती करण्याचे ठिकाण मानतो.पण या वेबसीरिजच्या माध्यमातून तुम्हाला गोव्याची वेगळी बाजूदेखील पाहता येणार आहे. गोव्यातील वास्तव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नक्कीच तिथे सुट्ट्या व्यतित करता येतात. पार्टी व मौजमज्जा करता येते पण एक काळी बाजूदेखील आहे ती म्हणजे माफिया. माफीया, एण्टरटेन्मेंट इंडस्ट्री, क्लब, म्युझिक याचबरोबर राजकीय नेते, राजकीय व्यवस्था अशा सर्व गोष्टी यात दाखवण्यात आल्या आहेत. मी यात तारा नामक डीजे प्लेयरची भूमिका साकारली आहे. ती पोर्तुगलवरून डीजेसाठी गोव्यात येते व तिथे ती माफियांमध्ये येऊन फसते. तिची प्रेमकथा देखील यात पाहायला मिळणार आहे.