Exclusive : शाहरूख खानच्या भेटीसाठी नाशिकच्या मुलींनी पलायन करून गाठले मन्नत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2017 04:04 PM2017-05-24T16:04:34+5:302017-05-24T21:36:07+5:30

सतीश डोंगरे बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्याप्रती किती दिवानगी असू शकते याचा अंदाज करणे अवघडच म्हणावे लागेल. आता हेच ...

Exclusive: Nasik's girls get paid for the visit of Shah Rukh Khan! | Exclusive : शाहरूख खानच्या भेटीसाठी नाशिकच्या मुलींनी पलायन करून गाठले मन्नत!

Exclusive : शाहरूख खानच्या भेटीसाठी नाशिकच्या मुलींनी पलायन करून गाठले मन्नत!

googlenewsNext
<
strong>सतीश डोंगरे


बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्याप्रती किती दिवानगी असू शकते याचा अंदाज करणे अवघडच म्हणावे लागेल. आता हेच बघा ना नाशिकच्या एकाच कुटुंबातील तब्बल सहा अल्पवयीन मुलींनी घरातून पलायन करीत थेट ‘मन्नत’ गाठले; मात्र यामुळे या मुलींचा शोध घेताना पालकांची चांगलीच दमछाक झाली. अखेर पोलिसांनी सर्व मुलींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. 

वास्तविक शाहरूखची एक झलक बघण्यासाठी ‘मन्नत’ बंगल्याबाहेर नेहमीच त्याच्या चाहत्यांची गर्दी असते. मुंबईत गेल्यानंतर त्याचे चाहते हमखास मन्नतला भेट देत असतात. या मुलींबाबत काहीसे असेच झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचे पालक मुलींना घेऊन ‘मन्नत’ला गेले होते; मात्र त्यावेळी त्यांना शाहरूखची झलक बघता आली नाही. ही खदखद या मुलींच्या मनात कायम होती. अखेर मुलींनी मंगळवारी (दि.२३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरातून पळ काढला. सुरुवातीला त्या सप्तशृंग गडावर गेल्या. त्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास त्या नाशिकमधीलच दिंडोरी नाका परिसरात आल्या; मात्र त्या घरी गेल्या नाहीत. पुढे त्यांनी थेट नाशिकरोड गाठून शताब्दी एक्स्प्रेसने दादरपर्यंत प्रवास केला. तेथून बांद्रा येथे शाहरूख खानच्या मन्नतवर हजेरी लावली. 



मात्र एकाच वेळी घरातून सहाही मुली गायब असल्याने पालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. १२ ते १५ वयोगट असलेल्या या मुली कुठे गेल्या असतील या विचारानेच पालक पुरते हतबल झाले. त्यांनी लगेचच म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून मुली हरविल्याची तक्रार नोंदविली. एकाच वेळी सहा अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले. पोलीस नाईक उत्तम पवार आणि महिला पोलीस शिपाई प्रिया विघे यांनी लगेचच सूत्र हलविण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ही माहिती पोलीस आयुक्त, उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्तांच्या कानावर घातली.

त्यातच पालकांनी मुली मुंबईला जाऊ शकतात, अशी हिंट पोलिसांना दिल्याने तपासाची चक्रे तातडीने फिरविण्यात आली. पोलीस नाईक पवार व पोलीस शिपाई विघे यांना लगेचच मुंबईला तपासासाठी पाठविण्यात आले़ शिवाय रेल्वे पोलीस, ठाणे, कसारा, कल्याण पोलीस ठाण्यातही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मुलींचे फोटो पाठविण्यात आले. पवार व विघे या दोघांनी रात्रभर मुंबईतील विविध बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकांवर पाहणी केली़ मुलींना अभिनेता शाहरूख खानचे प्रचंड आकर्षण असल्याची माहिती मिळताच त्यांनी बांद्रा येथील मन्नत बंगल्यासमोर तपास केला असता, मुली बंगल्याबाहेर बसलेल्या असल्याचे आढळून आले. 



२४ तासांत पोलिसांनी मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान, यावेळी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी या सहाही मुलींचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा असे न करण्याचे सांगितले़ मुली भेटल्याचा आनंद पालकांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होता. मूळचे गुजरातच्या सौराष्ट्रमधील मात्र व्यवसायानिमित्त नाशिक शहरात स्थायिक झालेले दोघे भाऊ आपल्या कुटुंबीयांसह पेठ परिसरात राहतात़ या दोघा भावांना प्रत्येकी तीन मुली आहेत. या सहाही मुलींना चित्रपटातील नायक-नायिकांचे त्यातही विशेषत: शाहरूख खानचे प्रचंड आकर्षण आहे. 

पोलिसांचा यशस्वी शोध
म्हसरूळ परिसरातील एकाच कुटुंबातील सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, पोलीस नाईक उत्तम पवार, पोलीस शिपाई प्रिया विघे यांनी तपासाची चक्रे फिरविली. मुंबईत मुली जाऊ शकतात, या एका क्ल्यूवर आमच्या टीमने रात्रभर मुंबईत शोध घेतला. अखेर त्या मन्नत बंगल्याबाहेर सापडून आल्या. या मुलींबरोबर काही अघटित घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा शोध घेतल्याचे समाधान वाटते.याबाबत मुलीच्या पालकांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत़
- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक़

Web Title: Exclusive: Nasik's girls get paid for the visit of Shah Rukh Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.