Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
By कोमल खांबे | Published: September 17, 2024 05:01 PM2024-09-17T17:01:26+5:302024-09-17T17:01:48+5:30
Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोहम शाहने लोकमत फिल्मीशी खास बातचीत केली.
२०१८ साली प्रदर्शित झालेला 'तुंबाड'सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. उत्कृष्ट कथा, सिनेमॅटोग्राफी, क्लायमॅक्स आणि व्हिएफएक्समुळे हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पुन्हा प्रदर्शित होताच 'तुंबाड'च्या सीक्वलचीही घोषणा करण्यात आली आहे. याच निमित्ताने 'तुंबाड' सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोहम शाहने लोकमत फिल्मीशी केलेली खास बातचीत.
'तुंबाड' पुन्हा रिलीज झाल्यानंतर आता ६ वर्षांनी सिनेमाला मिळणारं प्रेम पाहून कसं वाटतंय? विनायकचा रोल कसा मिळाला?
आमच्या सिनेमाला आता खरा न्याय मिळाला आहे. आम्ही हा सिनेमा मोठ्या पडद्यासाठीच बनवला होता. तेव्हा ओटीटी नव्हतं. सिनेमाचं प्रोडक्शन डिजाइन , व्हिएफएक्स अशा पद्धतीने बनवलं होतं की लोकांनी अशा सिनेमाचा थिएटरमध्ये आनंद घ्यावा असं आम्हाला वाटत होतं. हा अनुभव घेण्यासारखा सिनेमा होता. त्यामुळे त्या हेतूने 'तुंबाड' बनवला होता. आता तो उद्देश पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.
'तुंबाड' सिनेमात तू विनायक हे पात्र साकारलं आहेस. ही भूमिका आधी नवाजुद्दीन सिद्दीकी करणार होता, मग हा रोल तुझ्याकडे आल्यानंतर काय वाटलं? या सिनेमाची निर्मिती का करावीशी वाटली?
मला हा एक देशी सिनेमा वाटला. एका आजीची दंतकथा ऐकतोय, असं मला वाटलं. लोक या सिनेमाला हॉरर म्हणतात. पण, हा हॉरर सिनेमा नाही. ही केवळ एक दंतकथा आहे. लोभ आणि अतिहाव असणाऱ्या एका व्यक्तीची ही कहाणी आहे. त्यामुळे मला वाटलं की भारतात हा सिनेमा चालणार नाही तर मग कुठे चालणार? ही कथा मला इंटरेस्टिंग वाटली. नवाजुद्दीन सिद्दीकी आधी काम करणार होता. पण, ही फार जुनी गोष्ट आहे. त्यानंतर राही माझ्याकडे हा सिनेमा घेऊन आला होता.
'तुंबाड' आजही पाहिला की धडकी भरते. तर शूटींग करताना सेटवर काही वेगळ्या अथवा विचित्र गोष्टींचा अनुभव आला का?
सेटवर प्रोडक्शन टीम संध्याकाळी वाड्यात जेवणाची थाळी ठेवायची. मी त्यांना विचारलंही होतं की हे तुम्ही का ठेवत आहात? त्यानंतर मी त्यांना असं जेवणाचं ताट ठेवत जाऊ नका असं सांगितलं. पण, त्यानंतर मात्र शूटिंगमध्ये खूप व्यत्यय यायला लागला. अनेक वेळा लाइट जायची. काही ना काही कारणामुळे शूट थांबत होतं. त्यामुळे मग मी पुन्हा ती जेवणाची थाळी ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर शूटिंग व्यवस्थित होऊ लागलं. जेव्हा तुम्ही असे चित्रपट बनवता तेव्हा या गोष्टी होतात.
'तुंबाड २' बद्दल काय सांगशील?
जेव्हा 'तुंबाड' आला तेव्हाच आम्ही या सिनेमाच्या सीक्वलचा विचार केला होता. मी जेव्हा सोशल मीडियावर काहीही पोस्ट करायचो. लोक मला एकच प्रश्न विचारायचे की 'तुंबाड २' कधी येणार? पण, हवी तशी कथा मिळत नव्हती. जेव्हा कथा मिळाली तेव्हा आम्ही याचा सीक्वल बनवायचं ठरवलं. आणि आता 'तुंबाड' पुन्हा प्रदर्शित झाला. म्हणून आम्ही या मुहुर्तावर सीक्वलची घोषणा केली. 'तुंबाड २'च्या शूटिंगला आम्ही २०२५ मध्ये सुरुवात करणार आहोत.
'तुंबाड'मध्ये अनिता दाते केळकरबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
अनिताबरोबर काम करताना मला खूप मजा आली. आम्ही खूप वेळ एकत्र काम केलं होतं. 'तुंबाड २ 'बाबत सांगायचं झालं तर अद्याप त्याचं कास्टिंग झालेलं नाही.
'तुंबाड २'मध्ये विनायकची झलक पाहायला मिळणार का?
'तुंबाड २' मध्ये तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार आहे. पण, सध्या याबाबत मला जास्त काही बोलता येणार नाही. पण, एवढं नक्कीच सांगू शकतो की 'तुंबाड'मध्ये तुम्हाला सोहम शाह नक्कीच पाहायला मिळेल.
'तुंबाड'बद्दल बॉलिवूड सेलिब्रिटींच्या काय प्रतिक्रिया होत्या?
'तुंबाड'ला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडून प्रेम मिळालं होतं. शाहरुख खानने 'तुंबाड'चा ट्रेलर पाहिल्यानंतर ट्वीट केलं होतं. मी स्वत: शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे त्याने केलेलं कौतुक माझ्यासाठी सगळ्यात मोठं होतं.
'तुंबाड २' मध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल?
'तुंबाड २' मध्ये प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळणार आहे. आता मी फक्त एवढंच सांगू शकतो की प्रेक्षकांना प्रलय पाहायला मिळेल.