500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 01:38 PM2024-09-30T13:38:16+5:302024-09-30T13:38:43+5:30
५०० रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Anupam Kher : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्य आहे. विशेषत: AI आल्यापासून गोष्टी अधिकच बिघडत चालल्या आहेत. अलिकडेच सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अशातच आता सोशल मीडियावर (Social Media) बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो (Anupam Kher) असलेली ५०० रुपयांची नोट (Currency Note) खूप चर्चेत आहे. यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घ्या.
५०० रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आल्याचं समोर आलं आहे. ज्याचा व्हिडिओ खुद्द अनुपम खेर यांनी स्वतः इंस्टाग्रामवर शेअर करून आश्चर्य व्यक्त केले आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "आता बोला. ५०० रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? खरचं काहीही होऊ शकते". या धक्कादायक व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नोटांचा आकार, रंग आणि डिझाईन अगदी खऱ्या नोटांप्रमाणेच आहे. त्या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिझोल बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. या बनावट नोटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इंडियन एक्स्प्रेसनुसार, सराफा व्यापारी मेहुल ठक्करकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सराफा व्यापाऱ्याने सांगितले की, 1 कोटी 60 लाख रुपये रोख स्वरूपात द्यायचे होते. एका व्यक्तीने रोख रक्कम भरुन बॅग दिली. बॅग उघडली असता त्यात महात्मा गांधींच्या जागी अनुपम खेर यांच्या फोटोसह बनावट नोटा आढळून आल्या.
व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर या नोटा कशा बनवल्या आणि त्यामागील सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. बनावट नोटा कोठून छापल्या जात आहेत आणि अशा किती बनावट नोटा चलनात आल्या आहेत, हे शोधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. जर तुमच्या हातीही अशी नोट आली थोडी सावधगिरी बाळगा.