वीर पहारियावर जोक मारल्याने प्रसिद्ध कॉमेडीयनवर हल्ला, म्हणाला- "१०-१२ लोक आले अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:35 IST2025-02-04T18:34:40+5:302025-02-04T18:35:00+5:30
बॉलिवूड अभिनेता वीर पहारियावर जोक मारल्याने प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वीर पहारियावर जोक मारल्याने प्रसिद्ध कॉमेडीयनवर हल्ला, म्हणाला- "१०-१२ लोक आले अन्..."
बॉलिवूड अभिनेता वीर पहारियावर जोक मारल्याने प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणित मोरेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत माहिती देत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये प्रणित मोरेवर हा हल्ला करण्यात आला. या पोस्टमध्ये नेमकं काय झालं? त्याबाबत माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं?
आम्हाला एका भयानक घटनेबद्दल बोलायचं आहे, जी अलिकडेच घडली आहे. २ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता सोलापूरमधील 24K Kraft Brewzz येथे प्रणितचा स्टँड-अप शो झाल्यानंतर तो नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि फोटोसाठी थांबला. गर्दी कमी झाल्यावर, ११-१२ जणांचा गट, चाहत्यांच्या वेशात त्याच्याजवळ आला. पण ते फोटोसाठी आले नव्हते. ते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी आले होते.
त्यांनी निर्दयपणे त्याला मारहाण केली. त्याच्यावर सतत ठोसे आणि लाथांचा वर्षाव केला, ज्यामुळे तो जखमी झाला. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तनवीर शेख होता. त्याने आणि त्याच्या टोळीने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा!" याचा थेट अर्थ म्हणजे पुन्हा जोक मारल्यास गंभीर परिणाम होतील.
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे व्हेन्यू 24K Kraft Brewzz येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. आणि आता सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी केलेल्या अनेक विनंत्यांना त्यांनी नकार दिला आहे. आम्ही पोलिसांकडेही मदतीसाठी संपर्क केला. त्यांनी मदतीसाठी येतो असं सांगितलं. पण कोणीही आले नाही.
जर केवळ विनोद केल्याने एका कॉमेडियनवर हल्ला होऊ शकतो तर याचा अर्थ आपल्या मुलभूत हक्कांचे आणि सुरक्षिततेचे काय? एक महाराष्ट्रीयन कलाकार म्हणून आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की महाराष्ट्रातच एका कलाकारावर असा हल्ला होईल. हे अत्यंत निराशाजनक, संतापजनक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
आम्ही मुंबईतून ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. आम्ही प्रशासनाला आग्रहाने विनंती करतो की त्यांनी त्वरित योग्य कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. जय महाराष्ट्र!
प्रणितच्या टीमकडून करण्यात आलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे. त्याबरोबरच चाहत्यांनी काळजीही व्यक्त केली आहे.