एकेकाळी रस्त्यावर भीक मागताना दिसली होती ही प्रसिद्ध मॉडेल, तिची अवस्था पाहून सर्वजण झाले होते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 11:30 AM2021-12-01T11:30:40+5:302021-12-01T11:31:04+5:30
अचानक ही मॉडेल गायब झाली आणि काही कालावधीनंतर ती रस्त्यावर भीक मागताना दिसली.
सिनेइंडस्ट्रीमध्ये जितका झगमगाट आहे तितकीच दुसरी काळी बाजूदेखील आहे. स्टार बनण्याच्या हेतूने लाखो लोक आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी येतात. मात्र काही जण हे स्वप्न पूर्ण करता करता नैराश्याच्या गर्तेत अडकतात. असेच काहीसे या प्रसिद्ध मॉडेलच्या बाबतीत घडले आहे. ही मॉडेल म्हणजे गीतांजली नागपाल. तिने माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबत रॅम्प वॉकदेखील केला आहे. त्यावेळी ती खूप चर्चेत होती आणि तिच्या सौंदर्याचीदेखील चर्चा व्हायची. मात्र कालांतराने ती गायब झाली आणि अचानक एकेदिवशी ती दिल्लीतील रस्त्यावर भीक मागताना दिसली.
गीतांजली नागपाल हे ९०च्या दशकातील मॉडेलिंग जगतातील मोठे नाव होते. तिने सुष्मिता सेनसोबत रॅम्प वॉक केला आहे. गीतांजली हरियाणातील हिसार इथली असून ती एका नेव्ही ऑफिसरची मुलगी होती. श्री राम कॉलेज मधून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ती दिसायला खूप सुंदर असल्यामुळे तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता.
मॉडेलिंगच्या जगात नाव कमावल्यानंतर घरच्यांचा नकार असतानाही गीतांजलीने एका जर्मन मुलाशी लग्न केले. त्यानंतर तिला मुलगा झाला, पण तिचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. ती नवऱ्यापासून विभक्त झाली. तिचा पती मुलासोबत जर्मनीमध्ये राहतो. त्यावेळी गीतांजली गोव्याला गेली होती तिथे तिची एका ब्रिटीश मुलाशी ओळख झाली. दोघांच्या पहिल्या भेटीनंतर प्रेम झाले आणि नंतर ही मॉडेल दिल्लीतील एका स्वस्त गेस्ट हाऊसमध्ये तिच्या प्रियकरासोबत राहत होती. गीतांजलीला दारूचे व्यसन, त्यानंतर अचानक ती दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागताना दिसली.
या काळात तिने घरकामही केले. तिची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की तिला रस्त्यावर आणि उद्यानात रात्र काढावी लागत होती. अशा परिस्थितीत, एकदा एका फोटोग्राफरने गीतांजलीला फोटो काढतो असे म्हटलं, तेव्हा तिने एखाद्या प्रसिद्ध मॉडेलप्रमाणे तिचा खांदा खाली करुन पोज द्यायला सुरुवात केली. जेव्हा तिच्याबद्दल फोटोग्राफरने जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गीतांजली कोण आहे हे त्याला समजले. त्यानंतर त्या फोटोग्राफरने पोलिसांना याची माहिती दिली आणि तिला पोलीस ठाण्यात नेले, त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सध्या ती कुठे आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.