सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार हे प्रसिद्ध दिग्दर्शक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 15:46 IST2019-04-14T15:44:41+5:302019-04-14T15:46:04+5:30
सत्ते पे सत्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, शक्ती कपूर, सचिन पिळगांवकर, सारिका, सुधीर, कवलजीत सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या

सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार हे प्रसिद्ध दिग्दर्शक?
बॉलीवूड मध्ये जुन्या चित्रपटांचा रिमेक करण्याचा ट्रेंडच आला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे रिमेक आपल्याला पाहायला मिळाले. आता या चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. सत्ते पे सत्ता या प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटाचा लवकरच रिमेक बनवला जाणार आहे.
1982 साली प्रदर्शित झालेला सत्ते पे सत्ता हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, शक्ती कपूर, सचिन पिळगांवकर, सारिका, सुधीर, कवलजीत सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. रोहित शेट्टी आणि फराह खान हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक मिळून या चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या हक्कावरून कायदेशीर लढाई गेल्या अनेक वर्षांपासून लढली जात असल्याचे वृत्त डीएनएने दिले आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, या चित्रपटाच्या हक्कावरून कायदेशीर लढाई अनेक वर्षांपासून कोर्टात सुरु आहे. ती लवकरच संपेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. कोणत्याही चित्रपटाचे रिमेक करण्याआधी रोहित त्यांचे हक्क विकत घेतो. त्यामुळे हक्क मिळाल्याशिवाय तो यावर काम करायला सुरुवात करणार नाही. रोहित चित्रपटाचे रिमेक बनवताना त्याच्या पद्धतीने त्या चित्रपटाला भव्य बनवतो. त्यामुळे चित्रपटाचे हक्क मिळाल्याशिवाय काहीही चर्चा करणे चुकीचे आहे.
फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत फराह खानने म्हटले होते की, रोहितच्या चित्रपटांची ती फॅन असून तो तिला भावाप्रमाणे आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यास ती उत्सुक आहे.
रोहितने गोलमाल सिरीज, सिंघम सिरीज, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत तर फराह खानने में हु ना, ओम शांती ओम यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सत्ते पे सत्ता या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी करतील याची त्यांचे फॅन्स वाट पाहत आहेत.