विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, 'तुझ्या दु:खाची कल्पना...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:18 IST2024-08-07T14:17:35+5:302024-08-07T14:18:10+5:30
वजनातील थोड्या फरकाने ती आता अपात्र ठरली आहे याचा सर्वांनाच झटका लागला आहे.

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, 'तुझ्या दु:खाची कल्पना...'
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) फायनल मॅचसाठी अपात्र ठरली. ५० किलो वजनी गटात तिचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं. या निर्णयाने विनेशसह संपूर्ण भारतीयांना धक्का बसला आहे. विनेशने फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत सर्वांनीच पाहिली. सर्वच विनेशला धीर देत आहेत. एका बॉलिवूड अभिनेत्याने विनेशसाठी पोस्ट शेअर केली आहे.
विनेश फोगाट अपात्र ठरली आणि भारतीयांचं स्वप्नभंग झालं. कुस्तीमध्ये फायनलपर्यंत पोहोचणारी ती पहिली महिला भारतीय होती. वजनातील थोड्या फरकाने ती आता अपात्र ठरली आहे याचा सर्वांनाच झटका लागला आहे. बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरने (Farhan Akhtar) विनेशसाठी भावूक पोस्ट शेअर केली. तो लिहितो, "विनेश, तुला झालेल्या दु:खाची आम्ही केवळ कल्पना करु शकतो पण समजून घेऊ शकत नाही इतकं हे मोठं आहे. असा शेवट पाहून तुझ्यासाठी खूप वाईट वाटत आहे. पण तुला एकच सांगू इच्छितो की तू ज्याप्रकारे खेळली आहेस ते पाहून आम्हाला सर्वांना तुझा अभिमान वाटतो. तू नेहमीच चॅम्पियन राहशील आणि असंख्य लोकांसाठी प्रेरणा असशील. keep your chin up"
फरहान अख्तरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही 'हार्टब्रोकन' अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान काल रात्रभर विनेशने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आज तिला डिहायड्रेशन झाले असून अॅडमिट करण्यात आले आहे. विनेशची सुवर्णसंधी हुकल्याने सर्वच भारतीयांचं स्वप्नभंग झालं आहे.