स्वप्नील शिंदेने 'साइशा' झाल्यानंतर सांगितला ऐश्वर्या रायला भेटल्याचा किस्सा, म्हणाली, 'तिने मला...'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:23 AM2024-01-12T11:23:57+5:302024-01-12T11:24:57+5:30
ट्रान्सवुमन असल्याचं जाहीर केल्यावर साइशा ऐश्वर्या रायला भेटली तेव्हा नेमकं काय घडलं?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदेने (Swapnil Shinde) लिंग बदल करत साईशा शिंदे (Saisha Shinde) झाल्याची घोषणा केली होती. स्वप्नील ते साइशा हा प्रवास तिने आपल्या मुलाखतींमधून अनेकदा सांगितला आहे. नुकतंच एका मुलाखतीत साइशाने ऐश्वर्या राय बच्चनसोबत (Aishwarya Rai Bachchan) आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. पहिल्यांदाच साइशा बनून आल्यावर ऐश्वर्याने दिलेला आदर पाहून रडू आल्याचंही सायशा म्हणाली. काय आहे तो किस्सा?
साईशा शिंदे म्हणजेच आधीचा स्वप्नील शिंदेने अनेक सिनेमांमध्ये फॅशन डिझायनरचे काम केले आहे. यानंतर स्वप्नीलने ट्रान्सवुमन असल्याचं जाहीर करत साइशा शिंदे ही नवी ओळख जगासमोर आणली. तसंच लिंग बदलही करुन घेतले. नुकतंच टिस्का चोप्राच्या युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत साइशा म्हणाली,"जेव्हा जगाला माझ्या ट्रान्सवुमन असण्याबद्दल माहित नव्हतं तेव्हा ऐश्वर्याने माझा आदर केला आणि माझा सम्मानही केला. ऐश्वर्या माझी जवळची मैत्रीण आहे. माझ्या जवळच्या व्यक्तींनाच तेव्हा माझ्या या बदलाबाबत मी सांगितलं होतं. म्हणूनच जेव्हा मी ऐश्वर्याला भेटायला जाणार होतो तेव्हा मी तिच्या मॅनेजरला सांगितलं की जो येणार आहे तो स्वप्नील नाही. तर साइशा येणार आहे. त्यामुळे तयार राहा. या गोष्टीची काळजी घ्या की मॅडमला धक्का बसू नये. सगळं सुरळीत होऊ दे."
ती पुढे म्हणाली,"जेव्हा मी ऐश्वर्याकडे फिटिंगसाठी गेले तेव्हा ऐश्वर्याने याची काळजी घेतली. ती मला स्वप्नील नाही तर सायशा म्हणूनच बोलत होती. प्रत्येकवेळी तिने माझं नाव साइशा असंच घेतलं. तिने मला आदर दिला. इतकंच नाही तर जेव्हा तिची मुलगी आराध्या आली तेव्हा तिने माझी ओळख साइशा अशीच करुन दिली."
सायशा तो प्रसंग कधीच विसरु शकली नाही. आजही ती त्या भेटीची आठवण काढते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं. समाजाची पर्वा न करता स्वप्नीलने हिंमत दाखवत लिंगबदल केलं आणि आपली नवी ओळख जगासमोर आणली. इतकंच नाही तर ती काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोरही आली. नीता अंबानी यांच्या एका इन्हेंटमध्ये तिने पापाराझींसमोर येत जगाला आपली ओळख करुन दिली होती.