आयुषमान खुराणाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, म्हणाला "चंडीगडहून मुंबईत स्वप्न घेऊन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 19:17 IST2025-01-23T19:16:11+5:302025-01-23T19:17:57+5:30
आयुषमानच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा रोवला गेलाय.

आयुषमान खुराणाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, म्हणाला "चंडीगडहून मुंबईत स्वप्न घेऊन..."
हिंदी चित्रपटसृष्टीतला सध्याचा सर्वात लोकप्रिय आणि आपल्या भूमिकांसाठी लोकांच्या लक्षात राहणारा अभिनेता म्हणजे आयुषमान खुराना. ट्रेनमध्ये गाणी गाणारा ते आज बॉलिवूडचा सुपरस्टार असा खडतर प्रवास त्यानं केलाय. त्यानं अभिनयाच्या जोरावर सगळ्यांना आपली दखल घ्यायला लावली. आता आयुषमानच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा रोवला गेलाय.
आयुषमान खुराणाची 'फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री' फ्रेम्सच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, "FICCI फ्रेम्सच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात पहिला ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचा सन्मान मिळाल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. चंडीगडहून मुंबईत स्वप्न घेऊन येणाऱ्या एका तरुणासाठी हा प्रवास खरोखरच अद्भुत ठरला आहे. आज माझे काम केवळ लोकांपर्यंत पोहोचले नाही, तर भारताच्या पॉप संस्कृतीचा भाग झाले आहे. या नवीन भूमिकेत मी आमच्या उद्योगाच्या उत्कृष्टतेचा आणि नाविन्याचा प्रचार करण्यासाठी FICCI सोबत काम करण्यास उत्सुक आहे".
FICCI फ्रेम्सच्या २५ व्या वर्धापन दिनाला आयुषमान खुरानाच्या सहभागामुळे विशेष महत्त्व लाभणार आहे. फिक्की फ्रेम्स ही भारतीय चित्रपट उद्योगाची एक आंतरराष्ट्रीय परिषद आहे. ही परिषद मुंबईत आयोजित केली जाते. या परिषदेत दिग्गज मंडळी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख ट्रेंड, नवीन तंत्रज्ञान आणि विविध आव्हानांवर चर्चा करतात. याचे नेतृत्व पूर्वी यश चोप्रा आणि करण जोहर यांनी केले होते. सध्या केविन वाझ यांच्या नेतृत्वाखालील FICCI फ्रेम्सचे आयोजन करण्यात येत आहे, तर सह-अध्यक्ष म्हणून संध्या देवनाथन आणि अर्जुन नोहवार यांची भूमिका आहे.