'फायटर'मधील 'शेर खुल गये' गाणं प्रदर्शित, हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री ठरतेय हिट; काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 01:53 PM2023-12-15T13:53:10+5:302023-12-15T13:53:27+5:30
'फायटर' या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. 'शेर खुल गये' हे फायटरमधील गाणं प्रदर्शित झालं असून यात दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असलेल्या 'फायटर'ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरनंतर या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. आता या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. 'शेर खुल गये' हे फायटरमधील गाणं प्रदर्शित झालं असून यात दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या हृतिकने शेर खुल गये गाण्यातूनही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याचे डान्स मुव्ह्स पाहून चाहते अवाक् झाले आहेत. हृतिकला दीपिकानेही उत्तम साथ दिली आहे. या दोघांची केमिस्ट्री हिट ठरत आहे. 'फायटर'मधील पहिल्याच गाण्याला काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज मिळाले असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रदर्शित होताच हे गाणं आणि हृतिक रोशन ट्वीटरवर ट्रेण्डिंग झाले आहेत. या गाण्यातील डान्समुळे हृतिकचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
'शेर खुल गये' हे गाणं एक पार्टी साँग आहे. हृतिक, दीपिकाबरोबरच या गाण्यात करण सिंग ग्रोव्हर आणि संजीदा शेखही दिसत आहेत. गाण्यातील हृतिकच्या डान्सवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या असल्या तरी हे गाणं प्रेक्षकांच्या फारसं पसंतीस उतरत नसल्याचं चित्र आहे. पण, 'फायटर'चा टिझर आणि गाण्यानंतर या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्कंठा अधिक वाढली आहे.
'पठाण' आणि 'वॉर'चं दिग्दर्शन करणाऱ्या सिद्धार्थ आनंदने 'फायटर' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी 'फायटर' सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडरची भूमिका साकारणार आहेत. तर अनिल कपूर ग्रुप कॅप्टन शमशेर पठानियाच्या भूमिकेत आहेत.