S. S. Rajamouli: प्राचीन सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवणार होते SS राजामौली, पाकिस्तानमुळे स्वप्न अपूरे राहिले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 07:05 PM2023-04-30T19:05:18+5:302023-04-30T19:06:18+5:30
उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटला उत्तर देताना राजामौली यांनी मोठी माहिती दिली.
S. S. Rajamouli: 'बाहुबली' आणि 'RRR'सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली(S.S.Rajamouli) हे सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे नाव बनले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या RRR या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकून भारताचे नाव जगात उंचावले. आरआरआर पाहिल्यानंतर संपूर्ण जगाने त्यांच्या कामाचे कौतुक केले. राजामौली काल्पनिक कथांवर भव्य-दिव्य चित्रपट बनवतात, पण जर त्यांनी भारतातील प्राचीन संस्कृतींवर चित्रपट बनवला असता तर..? त्यांनी यासाठी तयारीही केली होती, पण मोठी अडचण आली.
रविवारी राजामौली यांनी ट्विटरवर एका मोठ्या गोष्टीचा उलगडा केला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विटर थ्रेड शेअर केला, ज्यामध्ये भारतातील प्राचीन सिंधू संस्कृतीशी संबंधित काही चित्रे दिसत आहेत. राजामौली यांना त्यांच्या पोस्टमध्ये टॅग करत आनंद महिंद्रा म्हणाले, 'तुम्ही त्या कालखंडावर आधारित चित्रपट बनवा ज्यामुळे आपल्या प्राचीन सभ्यतेबद्दल जगभर जागरुकता निर्माण होईल.'
Yes sir… While shooting for Magadheera in Dholavira, I saw a tree so ancient that It turned into a fossil. Thought of a film on the rise and fall of Indus valley civilization, narrated by that tree!!
— rajamouli ss (@ssrajamouli) April 30, 2023
Visited Pakistan few years later. Tried so hard to visit Mohenjodaro. Sadly,… https://t.co/j0PFLMSjEi
या ट्विटला उत्तर देताना राजामौली यांनी सांगितले की, त्यांनी याआधीही असा विचार केला होता, पण त्यावर पुढे काम होऊ शकले नाही. राजामौली म्हणआले, 'सर... धोलावीरा (गुजरात) मध्ये 'मगधीरा'चे शूटिंग करत असताना मी एक झाड पाहिले होते, जे इतके प्राचीन होते की, त्याचे जीवाश्म बनले होते. सिंधू संस्कृतीची सुरुवात आणि शेवट दाखवणारा चित्रपट बनवायचा विचार केला होता. काही वर्षांपूर्वी मी पाकिस्तानातही गेलो. मोहेंजोदारोला जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण परवानगी मिळाली नाही, असे राजामौली म्हणाले.
मोहेंजोदारोमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी
मोहेंजोदारो हे जागतिक वारसा स्थळ आहे आणि ते पाकिस्तानमधील सिंधू नदीच्या काठावर आहे. येथे सिंधू संस्कृतीचे अवशेष आहेत. काही काळापूर्वी पाकिस्तानातील भीषण पाऊस आणि पुरामुळे मोहेंजोदारो धोक्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. हे वारसा स्थळ वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या पुरातत्व विभागाने सरकारला येथे पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे.
'बाहुबली' सारखा भव्य चित्रपट बनवणाऱ्या राजामौली यांनी सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवला, तर तो मोठ्या पडद्यावर पाहणे हा एक मोठी पर्वणीच असेल. त्यांची ही कल्पना कधीतरी पूर्ण होऊन जनतेला पडद्यावर पाहता येईल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्यासोबत आशुतोष गोवारीकर यांनी या प्राचीन सभ्यतेवर 'मोहेंजोदारो' चित्रपट बनवला आहे.