ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिकानंतर सलमान खानवर घालणार बंदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:53 PM2019-08-20T18:53:08+5:302019-08-20T19:01:04+5:30
पाकिस्तानात परफॉर्म केल्यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मिकावर बंदी घातली आहे आणि आता मिकामुळेच सलमान अडचणीत येणार आहे.
भारताने कलम 370 हटवल्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे जवळजवळ सर्व संबंध तोडून टाकलेत. दोन्ही देशात असे तणावाचे वातावरण असताना गायक मिका सिंग पाकिस्तानात गेला. नुसता गेलाच नाही तर तिथे एका कार्यक्रमात त्याने परफॉर्मन्सही सादर केला. त्यामुळे त्याच्यावर थेट बंदी घालण्यात आली आहे.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) मिकावर बंदी घातली असून मिका सिंग आणि त्याच्यासोबतच्या 14 क्रूमेंबर्सवर बंदी घातली गेली आहे. त्यानुसार, मिकावर भारतात कुठल्याही प्रकारचा परफॉर्मन्स, रेकॉर्डिंग, प्लेबॅक सिंगिंग आणि अॅक्टिंग करण्यावर बंदी आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात मिकाने परफॉर्मन्स सादर केला होता. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मिकावर बंदी घालण्यासोबतच इंडस्ट्रीमधील कुणीही मिकासोबत काम करणार नाही आणि जर कोणी असे केले तर त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. या सगळ्यामुळे आता सलमान खान अडचणीत येणार आहे.
सलमान खानचा पुढच्या आठवड्यात ‘अप, क्लोज अँण्ड पर्सनल विथ सलमान खान’ हा कार्यक्रम अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सलमानचा भाऊ सोहेल खानच्या इव्हेंट कंपनीने जॉर्डी पटेल यांच्या कंपनीसोबत आयोजन केले आहे. हा कार्यक्रम २८ ऑगस्ट रोजी हॉस्टन येथे होणार असून या कार्यक्रमामध्ये मिका सिंग हजेरी लावणार आहे.
मीडियाशी बोलताना जॉर्डी पटेल यांनी सांगितले आहे की, आम्ही भावेश पटेलसोबत काम करत असून त्यांच्यासोबत आमचे कॉन्ट्रॅक्ट आहे. यूएसमधील काही लोकल प्रमोटरने मिकाला या कार्यक्रमासाठी बोलावले असून या कार्यक्रमात कुठेच सलमान मिकासोबत स्टेज शेअर करणार नाहीये.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अशोक दुबे यांनी सांगितले आहे की, मिकावर बंदी घालण्यात आली असल्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आम्ही बंदी घालणार आहोत. सलमानने या परिस्थितीत मिकासोबत काम केले तर त्याच्यावर देखील बंदी घालण्यात येईल. कोणत्याही देशातील आयोजकांना कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापासून आम्ही थांबवू शकत नाही. पण ज्या व्यक्तींवर बंदी घालण्यात आली आहे, त्या कोणासोबतच आम्ही काम करणार नाही आहोत.