इम्तियाज अलीच्या ‘लैला’ला बनायचेयं ‘लेडी शाहरूख’; पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 09:55 PM2018-08-30T21:55:45+5:302018-08-30T21:58:07+5:30
एकता कपूर आणि इम्तियाज अली लवकरच ‘लैला मजनू’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटातून अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी हे दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत.
एकता कपूर आणि इम्तियाज अली लवकरच ‘लैला मजनू’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटातून अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी हे दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत. खरे तर तृप्तीचा हा दुसरा चित्रपट. यापूर्वी ‘पोस्टर ब्वॉयज’मध्ये ती दिसली होती. पण तरिही लैलाची भूमिका साकारायला मिळाल्याने तृप्ती जाम खूश आहे. इतक्या मोठ्या बॅनरचा चित्रपट ही माझ्यासाठी मोठी संधी आहे, असे अलीकडे एका मुलाखतीत ती म्हणाली.
बालपणापासून केवळ अॅक्टिंग करायचे, एवढेच तिचे स्वप्न होते. पण चित्रपटात अॅक्टिंग करेल, याची कल्पनाही तिने केली नव्हती. दिल्लीच्या एका एजन्सीशी जुळल्यानंतर तिला आॅडिशनची संधी मिळाली. ‘पोस्टर ब्वॉयज’ मिळाला आणि ती मुंबईतचं राहिली. २०१६ मध्ये ‘लैला मजनू’साठी तिने आॅडिशन दिले. पण ती रिजेक्ट झाली. यानंतर तिची मैत्रिण याच चित्रपटाच्या आॅडिशनसाठी जाणार होती. तृप्ती सहज म्हणून तिच्यासोबत गेली. पण आॅडिशन घेणाऱ्यांनी तृप्तीला आॅडिशन द्यायला सांगितले. तुम्ही आधीच मला रिजेक्ट केले आहे, असे तिने सांगितले. पण पुन्हा एकदा प्रयत्न कर, म्हणून त्यांनी तृप्तीला कॅमे-यासमोर उभे केले आणि ‘लैला मजनू’ तृप्तीला मिळाला.
याच तृप्तीला आता ‘लेडी शाहरूख’ बनण्याचे वेध लागले आहेत. होय, ताज्या मुलाखतीत खुद्द तृप्तीनेच ही इच्छा बोलून दाखवली. ‘मी शाहरूख खान सरांची खूप मोठी चाहती आहे. शाहरूख खान यांना ‘रोमान्सचा बादशाह’ म्हटले जाते. पण बॉलिवूडचे ‘रोमान्सची राणी’ मात्र कुणीही नाही. मला ‘रोमान्सची राणी’ बनायला आवडेल. मला ‘लेडी शाहरूख’ बनायला आवडेल, असे तृप्ती म्हणाली.
‘लैला मजनू’च्या सेटवरचा एक मजेशीर किस्साही तिने सांगितला. एक दिवस मी पहिला सीन दिला आणि इम्तियाज अलींनी मला जोरदार शाब्बासकी दिली. त्यांच्या त्या कौतुकाने मी सुद्धा भारावले. मनातल्या मनात जाम खूश झाले. पण नंतर मला कळले की, तो शॉट मी अतिशय वाईट दिला होता आणि इम्तियाज सरांनी उपहासात्मक पद्धतीने माझे कौतुक केले होते. यानंतर मी माझ्या कामाप्रती प्रचंड गंभीर झाले, असे तृप्ती म्हणाली.
लैला मजनूची प्रेमकथा सर्वाधिक ऐतिहासिक प्रेमकथांपैकी एक आहे. याआधीही लैला मजनूच्या अमर प्रेमकथेवर बॉलिवूड चित्रपट बनला आहे. या चित्रपटात ऋषि कपूरने मजनूची भूमिका साकारली होती. आता हीच कथा एका मॉडर्न रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकता या चियत्रपटाची निर्माती आहे तर इम्तियाज अली याचा प्रेझेंटर. इम्तियाजचा भाऊ साजिद अली हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे.