"लेकीचा विवाहसोहळा अर्ध्यात सोडून निघून जावसं वाटतं होतं" अनुराग कश्यपने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:00 IST2025-02-07T13:00:00+5:302025-02-07T13:00:53+5:30
अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप हिचा गेल्या वर्षी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे विवाहसोहळा पार पडला होता.

"लेकीचा विवाहसोहळा अर्ध्यात सोडून निघून जावसं वाटतं होतं" अनुराग कश्यपने केला खुलासा
लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपची लाडकी लेक आलिया कश्यप हिचा गेल्या वर्षी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे विवाहसोहळा पार पडला. तिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोअरसोबत ११ डिसेंबर २०२४ रोजी भारतात मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता अलिकडेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपनं खुलासा केला की त्याला लेकीचा (Anurag Kashyap On Daughter Aaliyah’s Wedding) विवाहसोहळा सोडून जावसं वाटतं होतं. याचं कारणही त्यानं सांगितलं.
अनुराग कश्यपनं नुकतंच The Hollywood Reporter India ला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "आलियाला लग्नबंधनात अडकताना पाहणं फार भावूक क्षण होता. जेव्हा तिचा जन्म झाला, तेव्हा मी खूप रडलो होतो आणि आता तिच्या लग्नातही माझ्यासोबत असंच घडलं. लग्नविधी सुरू असताना मला फार रडायला येत होतं. ती गेल्यानंतर मी १० दिवस सतत रडत होतो. मला माहित नाही की हे का घडले, पण मी अनोळखी लोकांसमोरही रडत होतो".
पुढे तो म्हणाला, "लग्नात त्यांनी एकमेकांना हार घातले. हवन झालं, तेव्हा मात्र मला असह्य होत होतं. मी फार भावनिक झालो होतो. मला लग्न सोडून जायचं होतं. तेव्हा रिसेप्शनही सुरु झालं नव्हतं. मी बाहेर जात होतो. पण विक्रमादित्य मोटवानेने मला थांबवलं. त्याने मला बाहेर नेलं. आम्ही एका मोठ्या वॉकसाठी गेलो आणि नंतर परत आलो".
आलियाचा पती हा एक अमेरिकन बिझनेस मॅन आहे. त्याचं एक युट्यूब चॅनलदेखील आहे. आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. लॉकडाऊनपासूनच ते एकत्र राहतही होते. गेल्या वर्षी त्यांनी गुपचूप साखरपुडाही केला होता. आलिया २३ वर्षांची असून शेन ग्रेगोयर २४ वर्षांचा आहे.