कलम 370 हटवण्याची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये लागलीय या गोष्टीसाठी चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:29 PM2019-08-07T19:29:56+5:302019-08-07T19:31:12+5:30
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आता बॉलिवूडच्या निर्मात्यांमध्ये एका गोष्टीसाठी चढाओढ लागली आहे.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारतीयांना चांगलाच धक्का बसला होता. या हल्ल्यात सीपीआरएफचे 40 सैनिक शहीद झाले. या हल्ल्यानंतर काहीच दिवसांनी पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते आणि नंतर त्यांना पकडण्यात आले होते. अभिनंदन पाकिस्तानी सैनिकांच्या हाती लागल्यानंतर ते परत कधी येणार यासाठी देशभरातील लोक प्रार्थना करत होते. तर त्याचवेळी बॉलिवूडमधील निर्माते याविषयावर चित्रपट बनवण्यासाठी नावे नोंदवत होते. त्यात बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक 2.0, पुलवामा हल्ला अशा नावांचा समावेश होता.
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आता बॉलिवूडच्या निर्मात्यांनी आर्टिकल 370, आर्टिकल 35 अ, काश्मीर हमारा है, धारा 370 यांसारखी चित्रपटांची नावं रजिस्टर करण्यासाठी धाव घेतली आहे.
क्वींटने दिलेल्या वृत्तानुसार, पुलवामा हल्ल्यानंतर मार्च महिन्यात बॉलिवूडमध्ये या हल्ल्याच्या संबंधित चित्रपट बनवण्यासाठी 34 चित्रपटांची नावे रजिस्टर करण्यात आली होती. त्यात अभिनंदन, 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा हल्ला, झिरो मर्सी पुलवामा आणि जोश इज हाय या नावांचा समावेश होता.
द इंडियन मोशन पिक्चर्सने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 20 ते 30 निर्मात्यांनी आर्टिकल 370, आर्टिकल 35 ए यांसारखी नावे नोंदवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. अनेकांनी तर या विषयावर त्यांना चित्रपट लवकरात लवकर बनवायला मिळावा यासाठी परवानगी देखील मागितली आहे. त्यांना परवानगी मिळताच त्यांना या विषयावर संशोधन करायचे असून चित्रपटात कोणते कलाकार असणार, तसेच चित्रीकरण कुठे करायचे यावर ते काम करायला सुरुवात करणार आहेत.
विकी कौशलच्या ऊरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. त्यामुळे देशभक्तीवरचे चित्रपट प्रेक्षकांना चांगलेच भावतात याची आता निर्मात्यांना कल्पना आलेली आहे.