अखेर 'धूम ४'ला मिळाला दिग्दर्शक, रणबीर कपूर बनणार व्हिलन, पोलिसाची भूमिका कोण साकारणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 05:41 PM2024-10-01T17:41:56+5:302024-10-01T17:42:43+5:30
Dhoom 4 : बॉलिवूडचा हिट फ्रँचायझी चित्रपट 'धूम ४' बाबतचे नवीन अपडेट समोर आली आहे.
बॉलिवूडचा हिट फ्रँचायझी चित्रपट 'धूम ४' (Dhoom 4) बाबतचे नवीन अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ज्या व्यक्तीने चित्रपटाची कथा लिहिली आहे, त्याच व्यक्तीकडे सोपवण्यात आल्याचे वृत्त अलीकडेच आले होते. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर विजय कृष्ण आचार्य म्हणजेच व्हिक्टर याचे दिग्दर्शन करणार आहेत.
सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला सांगितले की, विजय कृष्ण आचार्य यांनी 'धूम ४'ची स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यांनी 'धूम' फ्रँचायझीचे शेवटचे तीन चित्रपट लिहिले आहेत आणि एका चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. याच कारणामुळे आता या पुढच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. त्यांनी 'धूम ३' दिग्दर्शित केला, जो त्यावेळी सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक ठरला.
'धूम ४'मध्ये पोलिसाची भूमिका कोण साकारणार?
'धूम'च्या मागील तीन चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा पोलिसांच्या भूमिकेत दिसले होते. मात्र, 'धूम ४'मध्ये पोलिसांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटात रणबीर कपूर नकारात्मक भूमिकेत आहे. 'धूम' हा आदित्य चोप्राचा आवडता फ्रँचायझी चित्रपट आहे. सध्या चाहत्यांमध्ये रणबीर कपूरच्या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे.
'धूम' सिनेमाबद्दल
ही सीरिज २००४ पासून सुरू झाली होती. पहिला चित्रपट तयार झाला तेव्हा निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलचा विचारही केला नसेल. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की निर्मात्यांना फक्त 'धूम २'च नाही तर 'धूम ३' देखील बनवावा लागला. 'धूम ३'मध्ये अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, जॉन अब्राहम, ईशा देओल मुख्य भूमिकेत दिसले होते. 'धूम २' चित्रपटात हृतिक रोशन चोराच्या भूमिकेत होता आणि आमिर खान तिसऱ्या भागात चोराच्या भूमिकेत दिसला होता आणि या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.