हृतिक रोशनविरोधात फसवणुकीचा गुन्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 07:32 PM2018-08-28T19:32:13+5:302018-08-28T19:34:44+5:30
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. होय, हृतिक व अन्य आठ लोकांविरोधात चेन्नईत फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. होय, हृतिक व अन्य आठ लोकांविरोधात चेन्नईत फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण हृतिक रोशनच्या HRX या ब्रँडशी संबंधित आहे.
टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, आर. मुरलीधरन नामक व्यक्तिने हा एफआयआर दाखल केला आहे. आपल्याला २०१४ मध्ये हृतिकने लॉन्च केलेल्या HRX ब्रँडचा स्टॉकिस्ट बनवले गेले होते. पण हृतिक व अन्य लोकांनी मिळून आपल्याला गंडवले, असे तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. हृतिक व अन्य आठ लोकांनी मला फसवले. अनियमित पुरवठ्यामुळे मला २१ लाख रूपयांचे नुकसान सोसावे लागले. हृतिकच्या फर्मने आपल्याला नियमित पुरवठा केला नाही आणि आपल्याला न कळवताच अचानक संपूर्ण मार्केटींग टीमला डिजॉल्व्ह केले. यामुळे कुठलेच प्रॉडक्ट विकले गेले नाही. आपल्याकडील विकल्या न गेलेल्या मालाचा परतावाही दिला गेला नाही. कर्मचाऱ्यांचा पगार आणि गोदामाचे भाडे असे मिळून आपल्याला २१ लाख रूपयांचे नुकसान सोसावे लागले, असे मुरलीधरनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान मुरलीधरनच्या तक्रारीवर कोडुनगय्यर पोलिसांनी हृतिक व अन्यविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तूर्तास हृतिक ‘सुपर ३०’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. यानंतर सिद्धार्थ आनंदच्या एका अॅक्शनपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.