पहिल्यांदाच मानुषी छिल्लरच्या घरी विराजमान होणार गणपती बाप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 09:00 AM2020-08-22T09:00:00+5:302020-08-22T09:00:00+5:30
मानुषी छिल्लर पहिल्यांदाच घरी गणेशोत्सव साजरा करणार असल्याने बरीच उत्साही आहे!
सौंदर्यवती मानुषी छिल्लर लवकरच अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे आणि सध्या ती पहिल्यांदाच घरी गणेशोत्सव साजरा करणार असल्याने बरीच उत्साही आहे! ही 23 वर्षांची सौंदर्यवती मिस वर्ल्ड मूळ हरियाणाची असली तरी सध्या तिचे वास्तव्य मुंबईत आहे आणि हे शहरही तिच्यासाठी घरासारखेच आहे. तिला यंदा कुटुंबासोबत घरी गणेश पूजा करायची आहे.
पहिल्यांदाच घरी गणेश स्थापना करणारी मानुषी म्हणाली, "माझ्या आईवडिलांना नेहमी वाटायचं की मी विविध संस्कृतींचा अनुभव घ्यायला हवा, ते सगळं साजरा करायला हवं. मी मूळची हरियाणाची असले तरी आता मुंबईसुद्धा माझं घरच आहे. या शहरातला गणेशोत्सव मी पहिल्यांदा अनुभवला तेव्हा भारावून गेले होते. तो उत्साह, ते प्रेम, ती निष्ठा... महाराष्ट्रातील लोक ज्यापद्धतीने गणपती साजरा करतात ते सगळं फारच खास आहे आणि मी फारच मोहून गेले."
गणेश पूजेच्या तर ती लगेच प्रेमातच पडली आणि तिने लगेच ठरवलं की घरी गणपती आणायचा! मानुषी म्हणते, "मला घरी गणपती आणायचा आहे हे मी पालकांना सांगितलं. मला आठवतं ते लगेच हो म्हणाले आणि आनंदलेही. हे पहिलं वर्ष आहे माझं घरी आणण्याचं आणि यापेक्षा जास्त आनंदाचा क्षण काय असेल! माझ्यासाठी हे फार खास आहे. सगळ्यांना शांतता आणि भरभराट मिळो, अशी प्रार्थना मी करणार आहे."
देशातील एक सजग नागरिक म्हणून मानुषी इको-फ्रेंडली पद्धतीने हा सण साजरा करणार आहे. ती म्हणाली, "मी घरी जो गणपती आणणार आहे तो ईको-फ्रेंडली आहे. या मूर्तीमध्ये बिया पेरलेल्या आहेत. त्यामुळे विसजर्नही मी घरीच मातीच्या कुंडीत करणार आहे. या बियांना मी खूप जपणार आहे... त्यातून एक दिवस एक नवं आयुष्य आकार घेईल."
गणेश चतुर्थीपासून सणासुदीचा काळ सुरू होतोय. या निमित्ताने मानुषी भारतातील नागरिकांना संदेश देऊ इच्छिते. ती म्हणाली, "या प्रकारचे सण साजरे करणं फार महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे माणसं, संस्कृती एकत्र येतात. मात्र हे सारं आपण इको-फ्रेंडली पद्धतीने करू शकलो तर निसर्ग संवर्धनालाही हातभार लावू. मी जी गणेशमूर्ती आणणार आहे त्यातून काही संदेश पोहोचेल, अशी आशा आहे. आपण सध्या फार मोठ्या जैविक संकटाच्या तोंडावर उभे आहोत. त्यामुळे सगळ्यांनीच आपल्या धरेला वाचवणं, संवर्धन करणं गरजेचं आहे. हे आता समजून घ्यायलाच हवं."