Flashback 2019 : या चित्रपटांनी 2019 मध्ये केली दमदार कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 18:57 IST2019-12-27T18:56:16+5:302019-12-27T18:57:03+5:30
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी 2019 मध्ये बॉक्स ऑफिसवर 100 कोटीहून अधिक कमाई केली

Flashback 2019 : या चित्रपटांनी 2019 मध्ये केली दमदार कमाई
2019 मध्ये बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटीहून अधिक कमाई केली. जाणून घेऊया कोणते चित्रपट ठरले बॉक्स ऑफिसवर हिट...
कबीर सिंग
कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका यात शाहिदने साकारली होती. या चित्रपटाची कथा, शाहिद-कियाराचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटाने 278.24 इतकी कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती.
उरी: द सर्जिकल स्ट्राइक
उरी चित्रपटातील विकी कौशलच्या दरदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे २५० कोटीची कमाई करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. हा चित्रपट भारतीय सैन्याने पाकिस्तानावर केलेल्या सर्जिकल स्टाईकवर आधारित होता.
गली बॉय
रणवीर सिंगच्या गली बॉय या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात एका सामान्य कुटुंबातील मुलाचा एक प्रसिद्ध रॅपर व्हायचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला होता. रणवीरसोबतच आलिया भटच्या अभिनयाचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने 140 कोटीहून गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला होता.
भारत
भारत या चित्रपटात फाळणीच्या काळापासून आजपर्यंतचा काळ पाहायला मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटात सलमान खानचे वेगवेगळे लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील सलमान आणि कतरिना कैफच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील गाणी, सलमान-कतरिनाचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटाने तब्बल 300 कोटीहून अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली.
मिशन मंगल
मिशन मंगल या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने 178.11 कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले होते.
केसरी
अक्षय कुमार आणि परिणिती चोप्राच्या केसरी या चित्रपटाने 150 कोटीहून अधिक कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले होते. या चित्रपटात अक्षयचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.
टोटल धमाल
टोटल धमाल या चित्रपटात अनिल कपूर, अजय देवगण, माधुरी दीक्षित असे अनेक कलाकार होते. या चित्रपटाने 150 हून अधिकचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला.
सुपर 30
सुपर 30 या चित्रपटात हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित होता. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आतापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. त्यांच्याच आयुष्यावर आधारित असलेल्या सुपर 30 या चित्रपटाने 140 कोटीहून अधिक गल्ला जमवला होता.
दे दे प्यार दे
अजय देवगण, तब्बू आणि रकूल प्रीत सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या दे दे प्यार दे या चित्रपटात प्रेक्षकांना एक आगळीवेगळी प्रेमकथा पाहायला मिळाली होती. या चित्रपटाने 100 कोटीहून अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली.