या बॉलिवूडमधील अभिनेत्रीच्या पतीचे झाले निधन, बॉलिवूडमधील सेलिब्रेटींची तिच्या घरी लागली रिघ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 04:57 PM2019-07-30T16:57:46+5:302019-07-30T17:03:11+5:30
या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे.
कहकशां पटेलने हेरा फेरी या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील जभी कोई हसिना या गाण्यात ती थिरकली होती. या गाण्यातील तिचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये ती आयटम साँगवर थिरकली. यारो सब दुआ करो, सिली सिली औंदी है हवा, हुस्न जवानी यांसारख्या गाण्यांमध्ये देखील ती झळकली आहे. तिने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये खूपच कमी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी बॉलिवूडमधील अनेकांसोबत तिची खूप चांगली मैत्री आहे.
कहकशां पटेलचे लग्न आरिफ पटेल यांच्यासोबत झाले असून आरिफ यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते पटेल इंटिग्रेटेड लॉजिस्टिक लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह वाईस चेअरपर्सन होते. त्यांचे वयाच्या ४७ वर्षीं निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूड आणि बिझनेस जगतातील मंडळींना धक्का बसला असून बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. आरिफ यांना सोमवारी सकाळी हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांना अरहान आणि नुमैर अशी दोन मुले असून त्यांची मुले खूपच लहान आहेत.
आरिफ यांच्या निधनाची बातमी कळताच मलायका अरोरा, सुनील शेट्टी, त्याची पत्नी माना शेट्टी, मान्यता दत्त, साजिद नाडियाडवाला, संजय कपूर, अनन्या पांडे यांनी कहकशां पांडे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. आरिफ यांच्यावर अंतिम संस्कार बुधवारी होणार आहे. आरिफ यांच्या कंपनीच्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक शाखा आहेत.
कहकशां पटेल चित्रपटात झळकत नसली तरी ती अनेक फिल्मी पार्टींमध्ये दिसते. सलमान खानच्या कुटुंबियांसोबत तर तिची खूप चांगली मैत्री असून त्याच्या कुटुंबातील अनेक पार्टींमध्ये तिला पाहायला मिळते. कहकशां पटेलने मुंबईतील सोफिया कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर अभिनयक्षेत्राकडे वळली. कहकशांने पब्लिक डिमांड, सुपरहिट मुकाबला, बजाज सुपर १० यांसारख्या अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. लग्नानंतर तिने अभिनयक्षेत्रापासून दूर राहाणेच पसंत केले.