रणबीरच्या सिनेमातून साई पल्लवीचा पत्ता कट! आता 'रामायण'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 15:28 IST2024-02-06T15:16:39+5:302024-02-06T15:28:29+5:30
रणबीरच्या 'रामायण' सिनेमात साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार होती, पण आता बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली आहे

रणबीरच्या सिनेमातून साई पल्लवीचा पत्ता कट! आता 'रामायण'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका?
रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) २०२३ मध्ये 'अॅनिमल' (Animal) सिनेमातून सर्वांच्याच मनावर छाप पाडली. रणबीरच्या 'अॅनिमल'ने बॉक्स ऑफीसवर ५०० हून अधिक कोटींची कमाई केली. 'अॅनिमल'च्या यशाची गोडी चाखल्यावर रणबीर आता नितेश तिवारींच्या 'रामायण' (Ramayana) सिनेमाच्या शूटींगला सज्ज आहे. या सिनेमात रणबीर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रणबीरसोबत या सिनेमात सीतेच्या भूमिकेत साऊथची अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) झळकणार अशी चर्चा होती. पण आता मात्र नवीन बातमी समोर येतेय. साई पल्लवीचा 'रामायण' मधून पत्ता कट झाला असून लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला सीतामाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळालीय.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. जान्हवी कपूरने याआधी नितेश तिवारींच्या 'बवाल' सिनेमात अभिनय केला होता. त्यामुळे तिवारींनी साईऐवजी आता जान्हवीला सिनेमात सीतामाईंच्या भूमिकेत संधी दिल्याचं बोललं जात आहे. यामुळे साई पल्लवीच्या चाहत्यांची नक्कीच निराशा झाली असेल. रामायण सिनेमात रणबीर अन् साईला पाहायला लोकं उत्सुक होते. पण आता साईऐवजी जान्हवीची सितेच्या भूमिकेत वर्णी लागली आहे.
#Ramayana: #SaiPallavi out, #JanhviKapoor to play #Sita opposite #RanbirKapoor in #NiteshTiwari’s directorial? pic.twitter.com/UCkMih4wD3
— Hurry G (@Hurry_HG) February 6, 2024
'रामायण' सिनेमाबद्दल सांगायचं तर, रणबीर कपूर सिनेमात श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल झळकणार आहे. रावणाच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश पाहायला मिळणार अशी चर्चा आहे. याशिवाय लारा दत्ता कैकेयी, विजय सेथुपती बिभिषण तर बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात झाली असून २०२४ च्या अखेरीस किंवा २०२५ मध्ये हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.