बॉलिवूडमधील ‘गांधी’गिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 11:56 AM2016-09-29T11:56:06+5:302016-10-04T17:37:51+5:30

सतीश डोंगरे सत्याग्रह आणि अहिंसेच्या प्रभावी शस्त्राने ब्रिटिंशाना घायाळ करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रभाव बॉलिवूडमध्येही राहिला आहे. त्यांचे ...

'Gandhi' gossip in Bollywood | बॉलिवूडमधील ‘गांधी’गिरी

बॉलिवूडमधील ‘गांधी’गिरी

googlenewsNext
ीश डोंगरे
सत्याग्रह आणि अहिंसेच्या प्रभावी शस्त्राने ब्रिटिंशाना घायाळ करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रभाव बॉलिवूडमध्येही राहिला आहे. त्यांचे विचार आणि उपदेश जगभरात पोहचावे या उदात्त हेतूने निर्मात्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट बनविले. द मेकिंग आॅफ द महात्मा, गांधी माय फादर, हे राम अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना महात्मा गांधी यांचे जीवन दाखविण्याचा प्रयत्न केला गेला, तर ‘लगे रहो मुन्ना भाई’ या कॉमेडी मात्र तेवढ्याच अर्थपूर्ण चित्रपटातही ‘गांधी’गिरी दाखवून प्रेक्षकांना अहिंसेचा पाठ शिकवला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटांचा घेतलेला हा आढावा...


गांधी (१९८२)
रिचर्ड एटनबरो यांनी दिग्दर्शित केलेला ‘गांधी’ हा चित्रपट आतापर्यंतच्या महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटात बेन किंग्स्ले यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र अतिशय खुबीने साकारले आहे. त्यांच्या या भूमिकेला चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ‘आॅस्कर’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. चित्रपटाला एकूण सात आॅस्कर मिळाले आहेत. 


सरदार (१९९३) 
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘सरदार’ या चित्रपटातूनदेखील महात्मा गांधी यांचे चरित्र दाखविण्यात आले आहे. केतन मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पूर्णत: गांधीजींच्या विचारांवर आधारित आहे.


द मेकिंग आॅफ द महात्मा (१९९६)
निर्माता श्याम बेनेगल यांनी फातिमा मीर यांच्या ‘द एप्रेंटिसशिप आॅफ ए महात्मा’ या पुस्तकावर आधारित ‘द मेकिंग आॅफ द महात्मा’ या चित्रपटातून गांधीजी साकारले होते. पुस्तकाचे हुबेहूब नाट्यरुपांतर केल्याने चित्रपटाचा आशय मनाला भिडणारा होता. गांधीजींची भूमिका साकारणाºया रजित कपूर यांना अभिनयासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 


हे राम (२०००)
हिंदी आणि तामिळ भाषेत बनलेल्या ‘हे राम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता कमल हसन याने केले होते. हा चित्रपट फाळणी आणि गांधीजींची हत्त्या यावर आधारित आहे. चित्रपटात गांधीजींची भूमिका प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी साकारली होती. 



लगे रहो मुन्नाभाई (२००६)
राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून गांधीजींचे चरित्र अतिशय खुबीने लोकांपर्यंत पोहचविले. प्रेक्षकांना हा चित्रपट ऐवढा भावला की, पुढे ‘गांधी’गिरीचे अनेक किस्से समोर आले. गांधी विचारांना आधुनिक मुलामा दिल्याने लोकांना हा चित्रपट खूपच भावला होता. त्यांचे विचार लोकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचले. 


गांधी माय फादर (२००७)
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळ्या धाटणीचा असलेल्या ‘गांधी माय फादर’ या चित्रपटात गांंधीजींचा मोठा मुलगा हरिलाल यांची व्यक्तिरेखा मांडून गांधीजींचे कौटुंबिक जीवन लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला. दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी अतिशय खुबीने हे पात्र लोकांपर्यंत पोहचविले. या चित्रपटाला तीन गटांमध्ये राष्टÑीय पुरस्कार मिळाला होता. 


नेताजी सुभाषचंद्र बोस (२००५)
‘द मेकिंग आॅफ द महात्मा’ या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी पुन्हा एकदा ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या चित्रपटातून महात्मा गांधी साकारले होते. हा चित्रपट स्वातंत्र्य लढ्यावर आधारित असला तरी, गांधीजींच्या पात्राशिवाय चित्रपटाची कथा पूर्णत्वास जात नव्हती. त्यामुळे या चित्रपटात गांधीजींचे विचार बघावयास मिळाले. हा चित्रपट दोन विचारधारांवर आधारित आहे. 

Web Title: 'Gandhi' gossip in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.