Gandhi Jayanti 2024 : महात्मा गांधी यांनी पाहिलेला पहिला चित्रपट कोणता ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 07:27 AM2024-10-02T07:27:00+5:302024-10-02T07:27:00+5:30
महात्मा गांधींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमे पाहिलेत.
Gandhi Jayanti Special 2024 : आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. यंदा बापूंची 155 वी जयंती (Gandhi Jayanti 2024) साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचं मोलाचं योगदान आहे. अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. पण, तुम्हाला माहितेय महात्मा गांधी यांनी त्यांच्या संपुर्ण आयुष्यात किती सिनेमे पाहिले आहेत, आणि त्यांनी पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे. ते आपण जाणून घेऊया.
महात्मा गांधींना कधीच सिनेमाची आवड नव्हतीच, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमे पाहिले. बापूंनी त्यांच्या आयुष्यात फक्त दोन सिनेमे पाहिल्याचं म्हटलं जातं. त्यातला एक सिनेमा हिंदी आणि विदेशी होता. बापूंनी पाहिलेला 'रामराज्य' हा एकमेव हिंदी चित्रपट आहे. दिग्दर्शक विजय भट्ट दिग्दर्शित हा चित्रपट 1943 मध्ये खूप लोकप्रिय झाला होता.
रामराज्य' हा चित्रपट मात्र महात्मा गांधी यांनी 2 जून 1943 रोजी पाहिला. खरंतर हा चित्रपट महात्मा गांधी केवळ चाळीस मिनिटे बघणार होते. तेवढाच वेळ त्यांनी विजय भट यांना दिला होता. जुहूच्या शांतीकुमार मोरारजी यांच्या बंगल्यामध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग महात्मा गांधींसाठी ठेवले होते. परंतु महात्मा गांधी यांना हा चित्रपट इतका आवडला की, त्यांनी चाळीस मिनिटांची अट सोडून दिली आणि हा संपूर्ण चित्रपट आवडीने पाहिला.
राम आणि सीता यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात प्रेम अदीब आणि शोभना समर्थ (काजोलची आजी) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय बापूंनी 'मिशन टू मॉस्को' हा हॉलिवूड चित्रपट पाहिला होता, जो त्यांना अजिबात अवडला नव्हता, असे म्हटले जाते. महात्मा गांधींवर भारतात आणि परदेशात अनेक चित्रपट बनलेत. पण बापूंच्या आयुष्यात सिनेमाला विशेष स्थान नव्हते. सिनेमा आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याविषयी त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता, कदाचित त्यामुळेच त्यांनी नेहमीच चित्रपटांपासून स्व:ताला दूर ठेवले होते.