Ganesh Chaturthi 2019: गणेशोत्सवच्या निमित्ताने आवर्जून ऐका ही गाणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 08:07 AM2019-09-02T08:07:48+5:302019-09-02T08:08:52+5:30
गणेशोत्सव म्हटला की, हिंदी चित्रपटातील काही गाणी आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतातच...
बॉलिवूडमधील गाणी आणि गणेशोत्सव यांचे खूपच जवळचे नाते आहे. गणेशोत्सव म्हटला की, हिंदी चित्रपटातील काही गाणी आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतातच... जाणून घेऊया बॉलिवूड चित्रपटातील ही प्रसिद्ध गीते...
देवा श्री गणेशा
देवा श्री गणेशा हे गाणे अग्निपथ या चित्रपटातील असून हृतिक रोशनवर हे गाणे चित्रीत करण्यात आलेले आहे. या गाण्याचा गायक अजय गोगावले असून हे गाणे त्याने खूपच चांगल्याप्रकारे गायले आहे. या गाण्याला संगीत अजय-अतुल जोडीनेच दिले आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. हे गाणे चांगलेच हिट असून रसिकांना ते प्रचंड आवडते.
मोरया रे
मोरया रे गाणे डॉन चित्रपटातील असून या गाण्यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने ताल धरलेला आपल्याला दिसून येतो. हे गाणे शंकर महादेवनने गायले असून संगीत देखील एहसान-लॉय-शंकर या तिकडीने दिले आहेत. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या गाण्याने रसिकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे.
सुखकर्ता दुःखहर्ता
सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आपल्या प्रत्येकाच्या घरात गणेशाच्या आगमनानंतर गायली जाते. हीच आरती एका वेगळ्या अंदाजात अतिथी तुम कब जाओगे या चित्रपटात सादर करण्यात आली आहे. ही आरती या चित्रपटात अमित मिश्राने गायली असून प्रेक्षकांना ती चांगलीच भावली होती.
गजानना
बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गजानना हे गाणे रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. हे गाणे सुखविंदर सिंगने गायले असून या गाण्याचे बोल प्रशांत इंगोलेचे आहेत तर या गाण्याला संगीत श्रेयस पुराणिकने दिले आहे. या गाण्यातील गणेशाच्या भव्य मूर्तीने तर प्रेक्षकांचे मन जिंकले.
बाप्पा
बँजो या चित्रपटातील बाप्पा हे गाणे रितेश देशमुखवर चित्रीत केले असून या गाण्याचे चित्रण खूपच चांगल्याप्रकारे करण्यात आलेले आहे. हे गाणे विशाल दादलानीने गायले असून संगीत विशाल शेखर या जोडीने दिले आहे तर या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यचे लिहिले आहेत.