"सत्य बाहेर यावं अशी इच्छा आहे"; समन्सनंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ पोहोचली ईडी कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:10 IST2024-12-09T15:08:36+5:302024-12-09T15:10:45+5:30

समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली होती.

Gehana Vasisth reached ED office after summons said cooperate in the investigation | "सत्य बाहेर यावं अशी इच्छा आहे"; समन्सनंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ पोहोचली ईडी कार्यालयात

"सत्य बाहेर यावं अशी इच्छा आहे"; समन्सनंतर अभिनेत्री गेहना वशिष्ठ पोहोचली ईडी कार्यालयात

Gehana Vasisth : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासोबत पोर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगात गेलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठ पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. ईडीने अभिनेत्री गेहना वशिष्ठला समन्स पाठवले होते. त्यानुसार सोमवारी गेहना वशिष्ठ ईडीसमोर हजर झाली होती. यावेळी बोलताना सत्य सर्वांसमोर यावे अशी माझी इच्छा आहे. या प्रकरणाच्या तपासात मी पूर्ण सहकार्य करत आहे, असं गेहनाने म्हटलं. तसेच आपण राज कुंद्रा यांना एकदाच भेटल्याचे गेहना वशिष्ठने म्हटलं आहे.

शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना ईडीने नुकतेच समन्स पाठवले होते. कथित पोर्नोग्राफीतून मिळालेले पैसे लाँडरिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आता या प्रकरणात ईडीने अभिनेत्री गेहना वशिष्ठ हिलाही समन्स पाठवले होतं. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी २०२१ मध्ये एफआयआर नोंदवला होता ज्यामध्ये गेहना वशिष्ठचीही मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा ईडीने समन्स पाठवल्यानंतर गेहना चौकशीसाठी कार्यालयात हजर झाली होती.

"२९ तारखेला माझ्या घरावर छापा टाकून सर्व काही तपासण्यात आले. माझ्या घरात कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळले नाही. तसेच कोणतीही चुकीची वस्तू सापडली नाही. तरीही माझी खाती गोठवली गेली आहेत. माझे म्युच्युअल फंड, एफडी, सर्व काही गोठवले गेले आहे आणि मला पीएमएलए कलमांतर्गत समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे मी तपासाला पाठिंबा देण्यासाठी इथे आले आहे. सत्य लोकांसमोर यावे ही माझी स्वतःची इच्छा आहे," असं गेहना वशिष्ठने म्हटलं.

राज कुंद्रा यांना आजपर्यंत एकदाच भेटले 

"तपास यंत्रणांकडे माझे सगळे कॉल डेटा रिकॉर्ड आहेत. माझा मोबाइलही यांच्याकडे आहे. गेल्या वर्षभरापासून माझं राज कुंद्रा यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी राज कुंद्रा यांना एकदाच भेटले आहे ते पण १३ जानेवारी २०२० रोजी. त्यावेळी ते फिल्म अॅप लॉन्च करणार होते. याच्यापेक्षा जास्त मी राज कुंद्रा यांच्यासोबत बोललेली नाही. ते मला विनाकारण यामध्ये खेचत आहेत," असा आरोप गेहना वशिष्ठ यांनी म्हटलं. 

"मी एक निर्माती म्हणून काम करते. ज्यांच्याकडून मला चित्रपट मिळतात आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. मला राज कुंद्रा यांच्या कंपनीकडून प्रत्येक चित्रपटासाठी तीन लाख रुपये मिळत होते. हे पैसे अनेकांना द्यावे लागतात. यामध्ये मी काय कमावलं असेल. मी फक्त दिग्दर्शनामधून माझी फी घेतली. मला यामध्ये का खेचलं जात आहे हे कळत नाहीये," असंही  गेहना वशिष्ठने सांगितले.
 

Web Title: Gehana Vasisth reached ED office after summons said cooperate in the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.