Girish Karnad Death: मराठी संस्कृतीला जोडून ठेवणारे संवेदनशील रंगकर्मी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:20 AM2019-06-10T10:20:57+5:302019-06-10T10:21:10+5:30

गिरीश कर्नाड म्हटलं की ‘तुघलक’ आणि ‘हयवदन’ ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यांसमोर येतात.

Girish Karnad: Noted Playwright, Actor and Filmmaker, Passes Away | Girish Karnad Death: मराठी संस्कृतीला जोडून ठेवणारे संवेदनशील रंगकर्मी

Girish Karnad Death: मराठी संस्कृतीला जोडून ठेवणारे संवेदनशील रंगकर्मी

googlenewsNext

बंगळुरूः प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचं आज निधन झालं आहे. गिरीश कर्नाड म्हटलं की ‘तुघलक’ आणि ‘हयवदन’ ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यांसमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरित झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही. आपलं बहुतांश लेखन कन्नडमध्ये करणाऱ्या या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नाही. ती कोकणी आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं. कर्नाड कुटुंबीय कोकणी असले तरी त्यांचा जन्म 19 मे 1938 रोजी माथेरान येथे झाला. पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरीत झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली.

गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बीए उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले. गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत. गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे. कर्नाड यांची 1961नंतर ययाती, तुघलक अग्नी और बरखा, नागमंडळ, अंजू मल्लिगे अशी अनेक नाटके गाजली. ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली.

कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा 70 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. 1982मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग असे. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वत:ला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले.

Web Title: Girish Karnad: Noted Playwright, Actor and Filmmaker, Passes Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.