केवळ ५० रुपये घेऊन राजेंद्र कुमार आले होते मुंबईत... काम मिळवण्यासाठी असा केला होता संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 09:54 AM2018-07-26T09:54:32+5:302018-07-26T09:55:54+5:30
राजेंद्र कुमार यांची आर्थिक परिस्थिती ही जेमतेम होती. पण अभिनेता बनायचे हे त्यांनी तरुणपणातच ठरवले आणि केवळ ६३ रुपये घेऊन ते आपले भाग्य आजमवण्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आले त्यावेळी त्या पैशांपैकी केवळ ५० रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहिले होते. ६३ रुपयांमधील १३ रुपये हे त्यांचे प्रवासाच्या तिकिटातच खर्च झाले होते.
राजेंद्रकुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्यांच्या अनेक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सिल्वर ज्युबली केली. त्यामुळे त्यांना ज्युबली कुमार म्हणूनच ओळखले जाते. राजेंद्र कुमार यांच्या कुटुंबियातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नव्हते. पण त्यांना अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्राकडे वळले. राजेंद्र कुमार हे मुळचे पाकिस्तानचे. पाकिस्तानमधील सियालकोट येथे त्यांचा २० जुलै १९२९ला जन्म झाला. राजेंद्र कुमार यांची आर्थिक परिस्थिती ही जेमतेम होती. पण अभिनेता बनायचे हे त्यांनी तरुणपणातच ठरवले आणि केवळ ६३ रुपये घेऊन ते आपले भाग्य आजमवण्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आले त्यावेळी त्या पैशांपैकी केवळ ५० रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहिले होते. ६३ रुपयांमधील १३ रुपये हे त्यांचे प्रवासाच्या तिकिटातच खर्च झाले होते.
मुंबईत आल्यावर आता काय करायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला होता. पण गीतकार राजेंद्र कृष्ण त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांच्या ओळखीने त्यांना एच.एस.रवैल यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यावेळी त्यांना या कामासाठी महिन्याला १५० रुपये मिळत असत. त्याकाळात ही रक्कम खूपच चांगली मानली जात असे. पण काही केल्या त्यांचे मन या कामात रमत नव्हते. त्यांना अभिनयक्षेत्रातच काम करायचे होते. १९५० ला त्यांना जोगन या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत नव्हते. या चित्रपटात दिलीप कुमार यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सहा वर्षं होऊनदेखील त्यांना म्हणावे तसे काम मिळत नव्हते. पण १९५७ मध्ये त्यांना मदर इंडिया या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांची भूमिका तितकीशी मोठी नसली तरी या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी त्यानंतर गुंज उठी शहनाई, मेरे महबूब असे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. नंतरच्या काळात तर बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली गेली.