Salman Khan : "सलमान आमच्या निशाण्यावर, संधी मिळताच मारणार"; गँगस्टर गोल्डी बरारची भाईजानला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:32 AM2023-06-27T10:32:59+5:302023-06-27T10:41:27+5:30
Goldy Brar And to Salman Khan : गोल्डी बरारने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो सलमान खानलाही संधी मिळताच मारेल. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. सलमानला अनेकदा जाहीरपणे धमकी देणाऱा गँगस्टर सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बरारने सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याची देखील कबुली दिली आहे. आता सलमान खान त्याच्या निशाण्यावर आहे. गोल्डी बरारने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो सलमान खानलाही संधी मिळताच मारेल. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
गँगस्टर गोल्डी बरारने सलमान खानला जाहीरपणे इशारा दिला आहे की, तो सलमान खानला नक्कीच मारणार आहे आणि त्याला लॉरेन्स बिश्नोईकडून विशिष्ट सूचना मिळाल्या आहेत. "भाईसाहब (लॉरेन्स बिश्नोई) यांनी स्पष्ट केलं आहे की, तो माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला माफ करणार नाही. जसे आम्ही आधीच सांगितले आहे की आमचं लक्ष्य सलमान खान आहे आणि आम्ही यशस्वी होईपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू" असं म्हटलं आहे.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येची कबुली देत गोल्डी बरारने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "हे खूप विचारपूर्वक केलं आहे. त्यासाठी त्याग करावा लागेल, पण जे आवश्यक होतं ते आम्ही केलं आहे." याचे कारण स्पष्ट करताना गोल्डी बरार म्हणाला, "तो खूप गर्विष्ठ आणि बिघडलेला होता. त्याच्याकडे पुरेसे पैसे होते. राजकीय शक्ती आणि पोलिसांच्या अधिकाराचा अतिरेक होता, ज्याचा तो गैरवापर करत होता. त्याला धडा शिकवणे गरजेचे होते."
गोल्डी बरार पुढे म्हणाला की, "त्याने आमचं असं काही वैयक्तिक नुकसान केलं आहे, अशा काही चुका केल्या आहेत ज्या माफीच्या लायक नाहीत. विकी मिडूखेडाच्या हत्येनंतर मी अनेक पत्रकारांना फोन केला. सिद्धूला मारण्यापूर्वी एका पत्रकाराला फोन करून त्याचे नाव जनतेसमोर येत असल्याचे सांगितले होते. पोलीस काहीच करत नाहीत, काँग्रेसचे सरकार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बसावे लागेल. कुणाला विचारा, त्याचे नाव आले आणि तो अधिकाऱ्यांसोबत खुलेआम फिरत आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.