Good Luck Jerry Movie Review: जान्हवी कपूरच्या जिगरबाज जेरीची हलकी-फुलकी स्टोरी 'गुडलक जेरी'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:56 PM2022-07-29T16:56:16+5:302022-07-29T16:57:22+5:30

Good Luck Jerry Movie Review : जाणून घ्या कसा आहे, जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला 'गुड लक जेरी' चित्रपट

Good Luck Jerry Movie Review: The light-hearted story of Jigarbaaz Jerry played by Janhvi Kapoor in 'Good Luck Jerry' | Good Luck Jerry Movie Review: जान्हवी कपूरच्या जिगरबाज जेरीची हलकी-फुलकी स्टोरी 'गुडलक जेरी'मध्ये

Good Luck Jerry Movie Review: जान्हवी कपूरच्या जिगरबाज जेरीची हलकी-फुलकी स्टोरी 'गुडलक जेरी'मध्ये

googlenewsNext

कलाकार : जान्हवी कपूर, दीपक डोब्रियाल, मिता वसिष्ठ, नीरज सूद, सुशांत सिंग, साहिल मेहता, सौरभ सचदेवा, संदीप नायक, जसवंत सिंग, मोहन कंबोज
दिग्दर्शक : सिद्धार्थ सेनगुप्ता
निर्माते : सुभास्करन अलीराजा, आनंद एल. राय, महावीर जैन
शैली : ब्लॅक कॅामेडी क्राईम स्टोरी
कालावधी : एक तास १९ मिनिटे
स्टार - तीन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे

'कोलामाऊ कोकीला' या तमिळपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी केलं असलं तरी त्यावर निर्मिते-दिग्दर्शक आनंद एल. राय यांचीच छाप जाणवते. राय यांच्या चित्रपटांनी नेहमीच एखाद्या छोट्याशा शहरातील सर्वसामान्य कॅरेक्टरभोवती कथानक गुंफून त्याला स्टार बनण्याची किमया केली आहे. हा चित्रपटही याला अपवाद नाही. कथानकापासून अभिनयापर्यंत सर्वच बाबतीत हलक्या-फुलक्या विनोदी क्षणांचा अनुभव देणारा हा चित्रपट फार गाजावाजा न करता मुंगी बनून साखर खाणाऱ्यांपैकी आहे.

कथानक : पंजाबमध्ये राहणारी जेरी नावाची बिहारी तरुणी, तिची आई शरबती आणि धाकट्या बहिणीची ही कथा आहे. वडीलांच्या निधनानंतर मोमोज विकून घर खर्च चालवणाऱ्या आईला हातभार लावण्यासाठी जेरी मसाज पार्लरमध्ये नोकरी करत असते, पण आईला ते पसंत नसतं. स्वत:च्या कमाईवर आपण सर्व गोष्टी ठिक करू असा विश्वास असणारी जेरी आईच्या विरोधाला न जुमानता नोकरी करते. अशातच आईला लंग कॅन्सर असल्याचं निदान होतं. आईच्या उपचारासाठी २५ लाख गोळा करण्याचं आव्हान जेरीसमोर उभं ठाकतं. सर्वजण हात वर करतात. अशातच अचानक जेरी समोर दुसरं संकट उभं ठाकतं. या संकटातूनच ती आईच्या आजारपणासाठी पैसे गोळा करण्यासाठी कसा मार्ग शोधते याची कथा यात आहे.

लेखन-दिग्दर्शन : पंकज मत्ता यांनी या चित्रपटाचं लेखन करताना बऱ्याच हलक्या फुलक्या क्षणांची पेरणी इतक्या सुरेखपणे केली आहे की ओठांवर सहज हसू फुलतं. टॉयलेटमधले काही क्षण टाळण्याची गरज होती. गंभीर प्रसंगांतूनही कशी हास्य निर्मिती केली जाते याचं उदाहरण सादर करणारा हा सिनेमा आहे. कमीत कमी मनोरंजक मूल्यांचा आधार घेऊन साधेपणानं केलेली मांडणी उत्तरोत्तर रंगत जाते. एखाद्या संकटासमोर हात-पाय न गाळता त्यातूनही मार्ग काढण्यासाठी संधी शोधण्याची गरज असते. झटपट पैसे कमावण्यासाठी यात दाखवलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मार्गाचं कदापी समर्थन करता येणार नाही. सर्वसामान्य मुलीही किती हुशार असू शकतात याचं दर्शन यात घडवलं आहे. चेहऱ्यावर साधेपणाचे भाव ठेवून कुटुंबाला सोडवण्यासाठी कोणत्याही नायकाने जे केलं असतं तेच जेरी करते. चोरांवर मोर बनते. गुंडावर सोडाच, पण पोलिसांवरही विश्वास न ठेवता सर्वांचे दात घशात घालते. यातील गाणी प्रसंगानुरूप आहेत. प्रत्येक कॅरेक्टर वल्ली आहे. 'हम जैसे दिखते है वैसे है नही...' हा या चित्रपटातील डायलॅाग जेरी खरा करून दाखवते. व्हॅनमधून आईला घेऊन जाण्याची योजना आखणं, तितक्यात जेरीच्या आशिकचं येणं, त्यानं आपल्या गाडीतून आईला घेऊन जाणं, पोलिसांनी अडवल्यावर आशिकनं व्हिडीओ बनवणं आणि बेडमध्ये ड्रग्ज असल्याचं समजल्यावर त्याची बोबडी वळणं हे सीन्स खूप छान झाले आहेत. क्लायमॅक्स थोडा गोंधळाचा वाटतो, पण गंमतीशीर आहे. सिनेमॅटोग्राफी आणि संकलनही चांगलं आहे.

अभिनय : पदार्पणापासूनच जान्हवी कपूरला अशा एखाद्या स्त्रीप्रधान चित्रपटाची नितांत गरज होती. ती उणीव 'गुडलक जेरी'नं भरून काढली आहे. जान्हवीनंही मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत सर्वसामान्य जिगरबाज तरुणीची भूमिका कुठेही अतिशयोक्ती न करता सहजपणे साकारली आहे. मिता वसिष्ठ यांनी आईच्या भूमिकेत कधी कणखरपणाचे, तर कधी मायेचे रंग भरले आहेत. या सर्वांपेक्षा आश्चर्यचकीत करणारी भूमिका दीपक डोब्रियालनं साकारली आहे. दीपक केवळ आपल्या अभिनयाद्वारे हसवत नाही, तर स्टाईल आणि गेटअपद्वारे लक्ष वेधून घेण्यातही यशस्वी ठरतो. मुख्य भूमिकेतील कलाकारांना नीरज सूद, सुशांत सिंग, साहिल मेहता, सौरभ सचदेवा, संदीप नायक, जसवंत सिंग आदींची चांगली साथ लाभली आहे.

सकारात्मक बाजू : पटकथेतील हलके-फुलके क्षण, कलाकारांचा अभिनय, प्रसंगानुरुप गाणी, ठराविक अंतराने आश्चर्याचे धक्के देणारे प्रसंग.
नकारात्मक बाजू : कल्पनेच्या पलिकडलं पाहण्याची इच्छा असणाऱ्यांना हा चित्रपट सामान्य वाटू शकतो. टॅायलेटमधील सीन्स अनावश्यक आहेत.
थोडक्यात : हळूहळू पटकथेशी एकरूप करणारी वातावरणनिर्मिती आणि कलाकारांच्या सुरेख अभिनयासाठी सर्वसामान्य कुटुंबातील जिगरबाज जेरीची ही स्टोरी पहायला हवी.

Web Title: Good Luck Jerry Movie Review: The light-hearted story of Jigarbaaz Jerry played by Janhvi Kapoor in 'Good Luck Jerry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.