Grey Divorce: गोविंदाचा पत्नी सुनितासोबत होणार 'ग्रे डिवोर्स'? नक्की काय आहे ही संकल्पना वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:40 IST2025-02-25T16:39:41+5:302025-02-25T16:40:29+5:30
Grey divorce: गोविंदाचा 'ग्रे डिवोर्स' होणार? चर्चांना उधाण

Grey Divorce: गोविंदाचा पत्नी सुनितासोबत होणार 'ग्रे डिवोर्स'? नक्की काय आहे ही संकल्पना वाचा
९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनिता (Sunita Ahuja) यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनिता अहुजा यांनी मुलाखतींमधून गोविंदाच्या अफेअर्सबद्दल बरंच काही सांगितलं. तसंच गोविंदा वेगळ्या घरात राहत असल्याचाही त्यांनी खुलासा केला. तर आता त्यांच्या निकटवर्तियाने माहिती दिली की सुनिताने काही महिन्यांपूर्वीच गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. यावरुन गोविंदाचा ३८ वर्षांचा संसार मोडणार असल्याची बातमी व्हायरल होत आहे. दरम्यान हा डिव्होर्स नाही तर ग्रे डिव्होर्स असणार आहे.
ग्रे डिव्होर्स म्हणजे काय?
गोविंदा आणि सुनिता अहुजा ११ मार्च १९८७ रोजी लग्नबंधनात अडकले. गोविंदाचं लग्नानंतरही अफेअर झालं आहे. अभिनेत्री नीलम कोठारीमुळे तर त्यांचा घटस्फोट तेव्हाच होणार होता. मात्र त्यांचा संसार वाचला. आता लग्नानंतर ३८ वर्षांनी दोघं विभक्त होत असल्याची चर्चा आहे. ३८ वर्ष हा बराच मोठा काळ आहे. गोविंदा आता ६१ वर्षांचा आहे तर पत्नी सुनिता ५७ वर्षांची आहे. ग्रे डिव्होर्स त्याला म्हणतात जेव्हा नवरा बायकोचं वय हे ५० पेक्षा जास्त असतं आणि दोघांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली असतात. म्हणजेच नवरा बायको ऐन उतारवयात घटस्फोटाचा निर्णय घेतात तेव्हा त्याला 'ग्रे डिव्होर्स' म्हणतात. यामध्ये दोघंही एकमेकांसोबत अर्ध आयुष्य जगलेले असतात. त्यामुळे जर गोविंदा आणि सुनिताचा घटस्फोट झाला तर तो 'ग्रे डिवोर्स' म्हणून ओळखला जाईल.
सध्या गोविंदाबद्दल उलटसुलट चर्चाही सुरु आहेत. त्याचं एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. अर्थात यात किती तथ्य आहे अजून समोर आलेलं नाही. गोविंदा आणि सुनिता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. टीना असं मुलीचं नाव असून यशवर्धन आहुजा हा मुलगा आहे. दोघांनी सिनेसृष्टीत नशीब आजमावलं आहे.