गोविंदाने 3 चित्रपटांची केली घोषणा, 'हिरो नंबर 1'ची जादू पुन्हा बॉलिवूडवर चालणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:17 AM2024-12-03T10:17:34+5:302024-12-03T10:17:49+5:30
गोविंदाने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे.
अभिनय, नृत्य आणि विनोदाचा उत्तम टायमिंग यामुळे एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा (Govinda). ८० – ९०च्या दशकात गोविंदाचे अनेक चित्रपट हिट ठरले होते. आजही जगभरात गोविंदाचा मोठा चाहतावर्ग आहे. आता गोविंदाने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे.
अलीकडेच 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2' मध्ये शक्ती कपूर, चंकी पांडे आणि गोविंदा हे सहभागी झाले होते. यावेळी गोविंदाने 3 चित्रपटांची घोषणा केली आहे. प्रदीर्घ काळानंतर गोविंदा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. 'बाएं हाथ का खेल' हा त्याचा पहिला चित्रपट आहे. दुसरा चित्रपट 'पिंकी डार्लिंग' असेल आणि तिसरा चित्रपट 'लेन देन इट्स ऑल अबाउट बिझनेस' हा असेल. मजेशीर गोष्ट म्हणजे या तीन चित्रपटांमध्ये गोविंदा व्यतिरिक्त शक्ती कपूर आणि चंकी पांडे देखील दिसणार आहेत.
गोविंदा हा बॉलिवूडचा एकमेव अभिनेता आहे, ज्याला प्रतिभेचा खजिना म्हणणं चुकीचं ठरणार नाही. गोविंदाने 'किल दिल', 'हीरो आ गया', 'फ्रायडे' आणि 'रंगीला राजा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. पण त्याला पूर्वीसारखी लोकप्रियता मिळाली नाही. लॉकडाऊननंतर गोविंदाने चित्रपटांपासून पूर्णपणे दुर राहिला. आता पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने गोविंदा चाहत्यांची मने जिंकू शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.