Govinda Birthday: गोविंदाने मोठ्या प्रेमाने अंगातला आवडता शर्ट काढला अन् राजकुमार यांना भेट दिला...पण पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 08:00 AM2022-12-21T08:00:00+5:302022-12-21T08:00:02+5:30
govinda birthday : होय, हा किस्सा आहे गोविंदाच्या शर्टचा. हा किस्सा आजही सांगितला जातो. तर किस्सा आहे ‘जंगबाज’ या सिनेमाच्या सेटवर.
बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणजे गोविंदा (Govinda). त्याचा हटके डान्स आणि कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगवर लोक फिदा होते. आजही आहेत. गोविंदा फेमस झाला तो त्याच्या अतरंगी डान्स स्टेप्समुळे, प्रत्येकाला थिरकायला भाग पाडतील अशा त्याच्या गाण्यांमुळे. लाल पॅन्ट आणि पिवळा शर्ट घालून नाचायचं धाडस त्या काळात फक्त एकट्या गोविंदानेच केलं. त्याच्या डान्स इतकाच त्याचा कॉमिक सेन्सही तेवढाच तगडा होता. त्यामुळेच 90 च्या दशकात गोविंदा म्हटलं की, त्याच्या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत. आज गोविंदाचा वाढदिवस. आता गोविंदाचा वाढदिवस म्हटल्यावर त्याचे अनेक जुने किस्से व्हायरल होणारच. सध्या असाच एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
होय, हा किस्सा आहे गोविंदाच्या शर्टचा. हा किस्सा आजही सांगितला जातो.
तर किस्सा आहे ‘जंगबाज’ या सिनेमाच्या सेटवरचा. 80 च्या दशकात आलेल्या या सिनेमात गोविंदा आणि राजकुमार (Raaj Kumar) एकत्र झकळले होते. एकेदिवशी शॉट संपला आणि गोविंदा व राजकुमार यांच्या गप्पा सुरू झाल्या. गोविंदानं घातलेला रंगीत शर्ट राजकुमार यांना आवडला होता.‘भाई, शर्ट तो तुम्हारी बहुत ही अच्छी है,’ अशा शब्दांत त्यांनी गोविंदाच्या शर्टचं कौतुक सुरू केलं. आता राजकुमार सारखा अॅक्टर तारीफ करतोय म्हटल्यावर काय? गोविंदा तर हुरळून गेला.
तो तडक उठला आणि मेकअप रूममध्ये गेला. त्याने अंगातलं शर्ट काढलं आणि ते राजकुमार यांना भेट म्हणून देण्यासाठी त्यांच्याजवळ गेला. राजकुमार यांना माझा शर्ट इतका आवडला तर तो त्यांना भेट द्यावा, इतकाच गोविंदाचा उद्देश होता. राजकुमार यांनीही गोविंदाने प्रेमानं दिलेली भेट स्वीकारली. पण.... हा किस्सा इथेच संपला नाही.
काही दिवसानंतर गोविंदा व राजकुमार यांची अचानक पुन्हा एकदा भेट झाला. तेव्हा गोविंदाचं लक्ष त्यांच्या रूमालाकडे गेलं. राजकुमार यांनी त्याने भेट दिलेल्या शर्टचा रूमाल बनवला होता आणि तो लोकांना दिसेल असा खिशात घालून ते रूबाबात फिरत होते.
राजकुमार मुळातच बेफिकीर, बिनधास्त, कोणाच्याही बापाला न घाबरणारे. आयुष्यभर तो हाच अॅटिट्यूड घेऊनच ते जगले. त्यांचा हा अॅटिट्यूड सगळ्यांनाच ठाऊक होता. बिचारा, गोविंदा तो रूमाल पाहून अशावेळी काय बोलणार?