कृष्णाला कोण भडकवतंय, कोणास ठाऊक..., भाच्यासोबतच्या वादावर पुन्हा बोलला गोविंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:36 AM2021-03-15T10:36:28+5:302021-03-15T10:36:58+5:30
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा भाच्यातील धूसफुस थांबण्याची चिन्हे नाहीत. आता पुन्हा एकदा गोविंदा कृष्णा अभिषेकवर भडकल्याचे दिसतेय.
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा भाच्यातील धूसफुस थांबण्याची चिन्हे नाहीत. आता पुन्हा एकदा गोविंदाकृष्णा अभिषेकवर भडकल्याचे दिसतेय. कृष्णा चांगला मुलगा आहे. पण त्याला भडकवतंय माहित नाही, असे गोविंदा म्हणाला.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने कृष्णा अभिषेकबद्दल बोलला. कृष्णा अनेक कॉमेडी शोमध्ये तुझी थट्टा करताना दिसतो, याबद्दल तू काय म्हणशील? असा प्रश्न गोविंदाला या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर तो असे का करतो, का वागतो, माहित नाही. त्याच्याकडून हे कोण करवून घेतेय, हेही मला माहित नाही. तसा कृष्णा खूप चांगला मुलगा आहे. तो माझी थट्टाच करत नाही तर माझी पब्लिक इमेजही खराब करतो आहे. त्याच्याकडून हे करवून घेणारा कुणीही असो, पण आम्हाला तर स्टेजवर तोच हे करताना दिसतो, असे गोविंदा म्हणाला.
कदाचित मला कृष्णाच्या करिअरला मदत केल्याची शिक्षा मिळतेय,असेही गोविंदा म्हणाला. मी सुद्धा नेपोटिजमचा बळी ठरलो होतो. त्या काळात मलाही काम मिळणे बंद झाले होते. अमिताभ यांनाही मी स्ट्रगल करताना पाहिले आहे. कृष्णाच्या करिअरला मी सपोर्ट केला. त्याचीच ही शिक्षा आहे का, मला माहित नाही, असे गोविंदा म्हणाला.
काही महिन्यांपूर्वी कॉमेडियन कृष्णा अभिषेकने मामा गोविंदासमोर परफॉर्म करण्यास नकार दिला होता. कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदा पाहुणा म्हणून आला होता पण, कृष्णा या एपिसोडमधून गायब दिसला होता. या निमित्ताने गोविंदा व कृष्णा यांच्या कौटुंबिक वादाची चर्चा रंगली होती. मामा असूनही गोविंदा आपल्या जुळ्या मुलांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला नव्हता, असा आरोप कृष्णाने यादरम्यान केला होता. यानंतर गोविंदाने लगेच एक स्टेटमेंट जारी करून कृष्णाचा आरोप खोडून काढला होता. जेव्हा कृष्णाचे जुळी मुलं हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मी परिवारासोबत त्यांना भेटायला गेलो होतो. माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याने त्यांना भेटावे, अशी कश्मीराची इच्छा नसल्याचे मला तिथे असलेल्या नर्सने सांगितले. मी आग्रह केल्यावर दुस-याच दिवशी आम्हाला दूरून मुलांना बघण्याची संधी मिळाली होती. यानंतर आम्ही जड मनाने तेथून निघून गेलोहोतो.कृष्णाला याबाबत काहीच माहीत नाही.कृष्णा आणि कश्मीरा सतत माझ्या विरोधात वक्तव्य करत आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कौटुंबिक वाद चव्हाट्यावर येतोय, याचे दु:ख आहे,असे गोविंदाने कृष्णाच्या आरोपांवर उत्तर देताना म्हटले होते.
असे सुरु झाले होते भांडण
कृष्णा व गोविंदा यांच्या वादाचे कारण ठरले होते एक ट्वीट. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने एक ट्वीट केले होते. त्यात लोक पैशांसाठी नाचतात असा उल्लेख करण्यात आला होता. हे ट्वीट गोविंदासाठी केले असा गोविंदाच्या कुटुंबियांचा समज झाल्याने त्यांनी कृष्णाच्या कुटुंबियांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कश्मीराने हे ट्वीट नणंद बहीण आरती सिंगसाठी (कृष्णाची बहीण) टाकले होते असे स्पष्टीकरण कृष्णाने दिले होते.